कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच मुख्यमंत्री ठाकरे ऑन फिल्ड; दौऱ्यांचा सपाटा सुरू

CM Uddhav Thackeray

मुंबई : मार्च महिन्यात देशभर कोरोनाची मोठी लाट आली. कधी नव्हे ते देशाला टाळं ठोकावं लागलं. त्यामुळे कोरोना आजार संपर्कात येणा-या प्रत्येकासाठी धोक्याचा ठरला. त्यामुळे बहुतांश मंत्र्यांची कामंही ऑनलाईनच सुरू झालीत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे  मातोश्रीबाहेर न पडणे हे  विरोधकांसह अनेकांसाठी टीकेचाच विषय बनला. मात्र, आता देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे.

तीच संधी मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हेरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानातून बाहेर पडत नाहीत, अशी ओरड सातत्याने विरोधकांकडून होत असताना कोरोनाचा जोर थोडा कमी होताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकामागून एक दौरे सुरू केले आहेत. गेल्या आठ महिन्यांत कोरोनामुळे विकासकामांचा वेग मंदावला असून त्याला गती देण्यासाठीच मुख्यमंत्री प्रत्यक्ष फिल्डवर उतरल्याचे बोलले जात आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दौरे टाळण्याची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री दौऱ्यावर येत असल्यास संबंधित सर्व यंत्रणांना त्यासाठी तयारी करावी लागते. तिथे गर्दी होणार हेसुद्धा निश्चित असते.

ही बाब लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय घेतला होता. यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सातत्याने टीका केली. मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थानातून बाहेर पडत नाहीत. ते घरात बसून राज्याचा कारभार हाकतात. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला नाही, अशा प्रकारची विधाने करण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांनी या टीकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरेल, असे कोणतेही पाऊल मी उचलणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली.

त्याच वेळी ऑनलाईन माध्यमाचा प्रभावीपणे वापर करत मुख्यमंत्र्यांनी बैठकांचा धडाका लावला होता. आता कोरोनाचा जोर बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून  त्यावरील लस लवकरच येण्याची शक्यता असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन विकासकामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ५ डिसेंबर रोजी अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली व आढावा घेतला. या मार्गाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालले आहे.

सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत आहोत. येत्या १ मेपर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मेपर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहचलेलो असू,असा विश्वास या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे उद्या (गुरुवारी) सातारा, रत्नागिरी आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पावरील कोयना टप्पा-४ विद्युतगृहाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर साताऱ्यातील पाटण येथे कोयना धरणाची ते पाहणी करणार आहेत.

ही पाहणी संपल्यानंतर हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री मावळला दाखल होतील. तिथून मोटारीने ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. २ च्या प्रकल्पस्थळाकडे जाणार आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची मुख्यमंत्री पाहणी करतील. प्रकल्पाच्या कॅम्प ऑफिसमध्ये याबाबत एक सादरीकरणही होणार आहे. ते पाहिल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईला परततील. महाराष्ट्र टाइम्सने ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER