अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केला शोक

Uddhav Thackeray & ravi Pathwardhan

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (Ravi Patwardhan) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८४व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.

रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने ‘भारदस्तपणा’ मिळवून देणाऱ्या जेष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो किंवा महाभारतातील धृतराष्ट्र असो; रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांमध्ये अक्षरशः प्राण ओतला. असा चतुरस्त्र कलाकार आज आपल्यातून गेल्याने मोठी हानी झाली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

वयाची ८० वर्षे पार करूनही त्यांनी अविरत काम केले. रवी पटवर्धन हे आजच्या कलाकारांसमोर आदर्श आहेत. एकाच साच्याच्या भूमिका न करता त्यांनी वैविध्य ठेवले आणि म्हणूनच त्यांची ओळख टिकून राहिली. सिने-नाट्य सृष्टीतील एक मराठमोळे भारदस्त आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून गेले, असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER