‘या क्षणी सरकार पाडून दाखवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विरोधकांना थेट आव्हान

CM Uddhav Thackeray

मुंबई : माझं आव्हान आहे, सरकार या क्षणी पाडून दाखवा. मुलाखत सुरु असताना सरकार पडल्याची बातमी येऊं दे” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी विरोधकांना आव्हान दिलं. सरकार अस्थिर करण्याचे जे प्रयत्न सुरु असतात, त्या संबंधीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी हे उत्तर दिले. माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. हे सरकार कोसळणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसत्ताच्या ७३ व्या वर्धापन दिन सोहळयात (73rd anniversary celebrations of Loksatta) ते बोलत होते. नरिमन पॉईंट येथील एक्स्प्रेस टॉवरमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हस्ते २०२० मधील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा दस्तावेज असणाऱ्या लोकसत्ता वर्षवेधचे प्रकाशनही पार पडले.

यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं. माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न नक्कीच होतं. आम्ही आव्हान देणारे आणि आव्हान स्वीकारणारे आहोत. जबाबदारीपासून पळणारे नाही. हिंदुत्वाच पेटंट भाजपाने घेतलेलं नाही. देशभरात हिंदुत्वाची पोकळी भरुन काढण गरजेचं आहे. लोकांना वाटतं पर्याय पाहिजे, तेव्हा पर्याय निर्माण होतो. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्र सरकाने अचानक चार तास आधी लॉकडाउनची घोषणा केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लगेच लॉकडाउन झाला. त्यावरून अनेक राज्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पण आता केंद्र सरकार सारं काही खुलं करा असं सांगत असतानाही महाराष्ट्रात मात्र त्याबाबत फार पाठिंबा दिसत नाही. यामागचा विचार काय? असा प्रश्न ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला. याबाबत उत्तर देताना, ‘मला खलनायक ठरवलं तरीही चालेल पण मी कोणतेही निर्णय घाईघाईने घेणार नाही’, असं रोखठोक उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

गिरीश कुबेर यांच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर आता हळूहळू केंद्र सरकारने लॉकडाउनच्या अटी शिथिल करणं सुरू केलं आहे. पण माझ्या राज्यात मी कोणतेही निर्णय पटापट घेणार नाही. कोणताही निर्णय घेताना तो निर्णय कसा बरोबर आहे हे आमचं सरकार जनतेला पटवून देईल. पण कितीही झालं तरी मी माझ्या जनतेवर निर्णय पटापट लादणार नाही. रेल्वे किंवा चित्रपटगृहाबाबत निर्णय घेण्यास उशीर लागला किंवा मला त्यामुळे खलनायक ठरवण्यात आलं तरीही चालेल पण मी घाईघाईने निर्णय घेणार नाही, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडले.

मागच्या वर्षी लोकसत्ताच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला आलो होतो, त्यावेळी मी पुढच्या वर्षी लोकसत्ताच्या कार्यक्रमाला येईल की, नाही असं अनेकांना वाटलं होतं. पण मी आलो. लोकसत्ताच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणूनच मी पुढची पाच वर्ष येईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणं, ही माझी जबाबदारी आहे म्हणून मी काळजी घेतोय. कुणालाही त्याच्या स्वातंत्र्यपासून रोखणं ही आनंद देणारी गोष्ट नाही, अशी खंत त्यांनी करोना काळातील अनुभवाबद्दल बोलताना व्यक्त केली. आपल्या देशात लसीकरण सुरु झालं आहे. पण लसीची उपयुक्तता किती आहे, ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, असा आशावादही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : ‘भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नाही…, उद्धव ठाकरे-मुनगंटीवारांच्या भेटीवर राष्ट्रवादी ची प्रतिक्रिया…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER