
मुंबई : मला आजही अत्यंत विश्वास आहे, मुख्यमंत्री पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात योग्य लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा नक्कीच घेतील. मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करतील, असा अद्यापही विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करताना दिली.
मंत्रिमंडळातल्या बाकी मंत्र्यांचं सोडून द्या, पण मुख्यमंत्र्यांची छवी ही चांगली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे अतिशय संवदेनशील व्यक्तीमत्व म्हणून बघते. त्यामुळे ते राठोडांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांनी महिलेवर अत्याचार केलेल्या पाटलाचे हातपाय तोडले होते. त्याचबरोबर महाराजांनी सुभेदाराच्या सूनेची मानसन्मानाने पाठवण केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी या दोन घटना डोळ्यांसमोर आणाव्यात. म्हणजे या संजय राठोड सारख्या नराधम्याचा राजीनामा घेणं तुम्हाला नक्कीच सुलभ होईल, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
संजय राठोड या माणसाबद्दल बोलून आपण आपलं तोंड खराब कशाला करुन घ्यायचं? इतका संतापजनक हा प्रकार आहे. एक बलात्कारी, हत्यारी माणूस लाखोंची गर्दी जमा करतो आणि मी निर्दोष आहे, असं म्हणतो. आज कॅबिनेटच्या बैठकीत जातो. काय चाललंय? मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना माफी देऊ नये. त्याची हकालपट्टी करावी. मंत्रिमंडळातील कोणत्याही नेत्याकडून हे अपेक्षित नाही. मुख्यमंत्री हे अतिशय चांगले, संवेदनशील आहेत. त्यांच्याकडे बघण्याची आमची भूमिका ही वेगळी आहे. जनता त्यांच्याकडे फार चांगल्या नजरेने बघते. मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, ते बाकीच्या इतर मंत्र्यांसारखे नाहीत. म्हणून मुख्यमंत्री या माणसाला हाकलून देतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं मत त्यांनी मांडलं.
बलात्कारांना वाचवण्यासाठी सत्ताधारी तीनही पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये चढाओढ चालली आहे. त्यांची ही एकी बाकीच्या ठिकाणी दिसली नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भंडाऱ्यात अकरा मुलं होरपळून मेली. याप्रकरणी 40 दिवस कोणताही एफआरआय दाखल झाला नाही. या प्रकरणात कोणत्याही मंत्र्यांची एकी आली नाही. पण बलात्कारी मंत्र्यांना पाठीशी घालण्यासाठी सर्व नेते एकत्र आले हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील एकाही नेत्याकडून मला अपेक्षा नाही. इकडून-तिकडून सगळे सारखे आहेत. आता अपेक्षा फक्त मुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी या हत्याराला पहिल्यांदा हाकलून द्यावं. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, हा आमचा विश्वास आहे, असंदेखील त्या म्हणाल्या.
आज हा विषय फक्त पूजा चव्हाण आणि संजय राठोड पुरता मर्यादित नाही. आज जर आपण गप्प राहिलो तर भविष्यामध्ये कुठलीही महिला, मुलगी स्वत:चा न्याय मागण्यासाठी पुढे येणार नाही. कारण हे असे धनदांडगे पैशांचा वापर करुन स्वत: शेण खायचं आणि सर्व समाजाला रस्त्यावर उतरायला लावतात. हाच ट्रेंड महाराष्ट्रामध्ये चालू झालाय. त्याचा परिणाम आपल्या पोरी-बाळींच्या आयुष्यावर होऊ शकतो. त्यासाठी आमची ही लढाई पूर्णपणे चालू राहील, जोपर्यंत न्याय मिळत नाही, असं चित्रा वाघ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला