भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री मैदानात?

CM Uddhav Thackeray - BJP

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, फोडाफाडीच्या राजकारणाला वेग आला आहे. त्यातच शिवसेनेने भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना शिवबंधनात अडकवण्याचा सपाटा लावला आहे. आता तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी रणनीती आखली कि काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच कारण म्हणजे आज मुख्यंमत्री ठाकरे भाजपच्या (BJP) गडात जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे एकूण नियोजन पाहता भाजपच्या गडाला फोडण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले तर नाही ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक गावांची निवड केल्याची माहिती पुढे आली आहे. उद्धव ठाकरे ज्या गावांचा दौरा करणार आहेत तो जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण पूर्णपणे भाजपचा गड आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नेमका हाच गट का निवडला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्याच्या जव्हार भागातील पर्यटन स्थळाच्या विकासात्मक बाबींसह जिल्ह्यातील विविध विषयांवर बोलणार असले तरी जव्हारच्या ज्या गावांमध्ये मुख्यमंत्री स्थळांना भेटी देणार आहेत, तो परिसर भाजपची व्होटबँक आहे. त्यामुळे भाजपचा गड फोडण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या गटात दाखल झाले का, असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या गोटात चलबिचल सुरु झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER