
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या प्रकरणी ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. राजीनामा घ्यायचा की नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.
तेच याबाबत निर्णय घेतील, असंही ते म्हणाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेंना (Sachin Waze) दरमहिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप सिंग यांनी केल्यानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली.
यावेळी त्यांनी राज्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी पवार म्हणाले की, परमबीर सिंग यांच्या पत्राचे दोन भाग आहेत. एक मोहन डेलकर प्रकरणावर आहे तर दुसरा वाझे प्रकरणावर आहे. डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. या पत्रात गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दरमहिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे, त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवलं आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेले नाहीत, देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र आलं, असाही दावा शरद पवारांनी केला. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे.
अनिल देशमुखांबद्दल उद्यापर्यंत निर्णय घेऊ, असेही शरद पवार म्हणाले. अनिल देशमुख यांचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल. याबाबत सर्वांशी बोलून निर्णय घेऊ, गृहमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग हे मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी अन्याय होत आहे, असे सांगितले होते, असेही पवार म्हणाले. मी आताच आग्र्याहून आलो आहे. मी या प्रकरणी आतापर्यंत केवळ मुख्यमंत्र्यांशीच बोललो आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी अजूनही चर्चा केली नाही.
राजीनामा घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांचा आहे. मात्र आमच्याशी चर्चा केल्यानंतरच ते निर्णय घेतील. त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही देशमुखांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि सहकाऱ्यांशीही चर्चा करू, असं पवार यांनी सांगितलं. मात्र, राजीनामा मागणं हे विरोधकांचं कामच आहे, असंही ते म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, नाइट क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तुम्हीही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. खरंच असं काही टार्गेट मुंबई पोलिसांना असतं का? असा प्रश्न एका पत्रकारानं शरद पवार यांना विचारला. त्यानतंर पवार हसले आणि म्हणाले “हे तुम्ही मला काय मुंबई पोलिसांच्या कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला किंवा माजी अधिकाऱ्याला विचारलं तर तेही हसतील, असं पवार म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला