साखरपट्ट्यात मुख्यमंत्र्यांचा झंझावात

CM Fadnavis

महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिलाच मुख्यमंत्री आहे, जो आपल्या कारभाराचा लेखाजोखा घेऊन जनतेपुढे आलो आहे, असे सांगत, दोन दिवसांच्या कोल्हापुरातील महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या साखरपट्ट्यात झंझावात निर्माण केला. चार दिवसांत त्यांनी तिन्ही जिल्हे पिंजून काढले. सातारा आणि इचलकरंजी येथे त्यांच्या रेकॉर्डब्रेक सभा झाल्या. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता कोल्हापुरातील चौकात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आली.

फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात करवीरनगरीत त्यांचे जल्लोषी स्वागत झाले. ‘तुमचा आशीर्वाद हाच जनादेश’ असे सांगत विधानभवनावर पुन्हा भाजप महायुतीचा झेंडा फडकविणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेकॉर्डब्रेक विकासकामे केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्यासह चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, महेश जाधव, समरजितसिंह घाटगे यांना आशीर्वाद असल्याचे जनतेकडून त्यांनी यावेळी वदवून घेतले. रात्री मुक्कामावेळी त्यांनी अलमट्टी धरणाचा पाणी फुगवटा, आशा वर्कर्स, सर्किट बेंच अशा विविध प्रश्नी निवेदने स्वीकारली. सोमवारी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री फडणवीस औरंगाबादला गेले.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानात ९ वाजता ध्वजारोहण केले. औरंगापूर येथे महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून ते साडेदहा वाजता पुन्हा कोल्हापुरात दाखल झाले.

सकाळी ११ वाजता ताराराणी चौकातून ढोलताशांच्या गजरात प्रचंड जल्लोषी वातावरणात महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली. मध्यवर्ती बसस्थानक, व्हिनस चौकात छत्रपती राजाराम महाराज पुतळा व दसरा चौकात राजर्षी शाहू महाराज पुतळ्याला वंदन करून यात्रा बिंदू चाैकात आली. येथून आझाद चौक, उमा टॉकिज चौक, गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम मार्गे संभाजीनगर येथून कळंबा येथे आली.

कळंबा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनसमुदायाला संबोधित केले. कोल्हापूरच्या विकासासाठी भाजप महायुतीला आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांना यावेळी बोलण्याची संधी दिली. महाडिक यांनी फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक यांनी कळंबा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यानंतर यात्रा राधानगरीच्या दिशेने रवाना झाली. गिरगाव आणि जैताळ फाट्यावर थांबलेल्या नागरिकांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या. हणबरवाडी व दिंडनेली ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर यात्रेला शुभेच्छा देणारे व मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक लावले होते. इस्पुर्ली ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा थांबत, फुलांचा वर्षाव करीत जंगी स्वागत केले. येवती, म्हाळुंगे फाटा, चुये, कावणे, निगवे, शेळेवाडी, चंद्रे, तळाशी, अर्जुनवाडा गावकऱ्यांनी फडणवीसांचे स्वागत केले. अंगारकी संकष्टीनिमित्त तुरंबे येथील गणेश मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याच्या कडेला भगव्या टोप्या आणि गळ्यात भाजपचे स्कार्फ घातलेल्या कार्यकर्त्यांकडून फडणवीसांनी शुभेच्छा स्वीकारल्या. बिद्री कारखाना परिसरात फडणवीस यांनी छोटी सभा घेतली.

समरजितसिंह घाटगे यांनी भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष धनंजय महाडिक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, आजी-माजी जि.प. सदस्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही तुमच्याबरोबर, अशी ग्वाही ब्रिदीकरांनी फडणवीसांना यावेळी दिली. मुदाळतिट्ट्यावर कागल आणि भुदरगड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. आपण दिलेला प्रतिसादच येत्या निवडणुकीची दिशा स्पष्ट करीत असल्याचे यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले. उंदरवाडी फाट्यावरील कार्यकर्त्यांना अभिवादन करून महायात्रा सरवडे येथे आली. दुतर्फा थांबलेल्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे जोरदार स्वागत केले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा गाव असलेल्या सोळांकुरात मोठे फलक लावून यात्रेचे स्वागत झाले. सोळांकुर व गैबी चौकात थांबलेल्यांना हात वर करून अभिवादन करत फडणवीस यांची यात्रा दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राधानगरी येथे दाखल झाली. भाजप कार्यालयाच्या दारात हजारो कार्यकर्ते सकाळपासून त्यांची वाट पाहात होते. छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा भेट देऊन राधानगरीकरांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने जेवढे काम केले त्याच्या दुप्पट काम पाच वर्षांत भाजप सरकारने केले आहे. हा दावा खोटा ठरल्यास मते मागायला येणार नाही, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले. तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर पुन्हा सत्तास्थापन करणार आहे.

राधानगरीकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा नक्की येईन, अशी ग्वाही देत, मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा कोकणात कणकवलीच्या दिशेने निघून गेली. कोल्हापूूर सांगली व सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास ऐकण्यासाठी जमलेली गर्दी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आणणारी ठरली.