जोरदार शक्तीप्रदर्शनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज शुक्रवारी (ता.4) ऑक्टोबर रोजी दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी भाजपने नागपुरात मोठे शक्तीप्रदर्शन केले.

ही बातमी पण वाचा : यावेळेस प्रचंड बहुमत युतीला मिळेल – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मोठा रोड शो नागपुरात आयोजित करण्यात आला होता. भाजपचे हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री फडणवीस आज उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे संपुर्ण राज्याचे विशेषतः नागपुरचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी सकाळी सपत्नीक नितीन गडकरी यांच्या घरी गेले. यावेळी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव हे सुद्धा उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांचे यावेळी औक्षण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रस्थान केले. प्रथम त्यांनी संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले आणि रॅलीला सुरुवात झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी रॅलीला संबोधितदेखील केले. उपस्थित समस्त जनांचे त्यांनी आभार मानले. तसेच यंदा प्रचंड मतांनी युतीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही रॅलीला संबोधित केले. एक लाख मताने आपल्याला निवडून आणू असे गडकरी म्हणाले. तसेच भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन गडकरींनी समस्त नागपुरकरांना केल. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेस आघाडीने आशिष देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.