‘फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन जाहीर’ – शिवसेना

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यभरात सोमवार ते शुक्रवार मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown) तर शुक्रवार रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला. मात्र याची घोषणा करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच विरोधी पक्षांशी चर्चा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. फडणवीस व राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोरोनाशी सामना करण्याबाबत सरकारला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिल्यावरच मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंधांची घोषणा केली, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

आजचा सामनातील अग्रलेख…

कोरोनाग्रस्तांचे (Corona) वाढते आकडे लक्षात घेऊन मुंबईसह राज्यभरात ‘जम्बो’ आरोग्य व्यवस्था उभी केली जात आहे. या महामारीला रोखण्यासाठीच सरकार हे सगळे करीत आहे. राज्यात आता लागू केलेले कडक निर्बंध आणि सप्ताहाअखेरचे लॉक डाऊन त्याचाच भाग आहे. या मिनी लॉक डाऊनमुळे धार्मिक स्थळे, चित्रपट-नाटय़गृहे, सलून, पार्लर, दुकाने, मॉल, बाजारपेठा बंद राहतील. ‘वर्क फ्रॉम होम’वर भर द्यावा लागेल. मंत्रालये, सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने काम करतील. मात्र ‘मिशन ब्रेक द चेन’ यशस्वी करणे हे नागरिकांच्याच हाती आहे. शेवटी हा लढा जगण्यासाठी आहे, तो प्रत्येकाने लढायचा आहे!, असे आवाहनही शिवसेनेने केले आहे.

रविवारी दिवसभरात देशात 93,249 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यातला महाराष्ट्राचा आकडा 57,074 इतका आहे. एकटय़ा मुंबईत 11,163 रुग्णांची नोंद झाली. हे चित्र भयंकर आहे. महाराष्ट्रात तरी कोरोनाची लाट बेकाबू झाली आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्र्यांनी ‘वीकेंड लॉक डाऊन’ची घोषणा केली आहे. 30 एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध आणि शुक्रवार रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण लॉक डाऊन केला जाणार आहे. लोक जबाबदारीने वागत नसल्यामुळेच सरकारला हे पाऊल उचलावे लागले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मिशन बिगीन अगेन’ या घोषवाक्यांना सरकारने मागील काही दिवसांत महत्त्व दिले, पण शेवटी आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याने सरकारला पुन्हा एकदा ‘ब्रेक द चेन’ या पहिल्या थांब्यावर यावे लागले आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरली आहे. या लाटेचा तडाखा एवढा जबरदस्त आहे की, गेल्या वर्षी सर्वात कमी रुग्णसंख्येवरून (8 हजार 392) सर्वोच्च रुग्णसंख्या होण्यासाठी 108 दिवसांचा कालावधी लागला होता. आता दुसऱया लाटेत 8 हजार 579 या फेब्रुवारी 21 मधील निचांकी रुग्णसंख्येवरून एक लाखाचा आकडा फक्त 62 दिवसांत गाठला गेला आहे. त्यावरूनही कोरोनाच्या दुसऱया लाटेचा वेग किती भयंकर आहे याचा अंदाज येतो. एवढेच नव्हे तर पुढील 15 दिवसांत या लाटेचा कहर खऱ्या अर्थाने दिसेल, असा धोक्याचा इशाराच तज्ञ मंडळी देत आहेत. या सर्व भयंकर शक्यतेचा विचार करून कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांनाच सज्ज व्हावे लागेल. ‘माझे प्राण माझीच जबाबदारी’ या भूमिकेत शिरावे लागेल. आरोग्य व्यवस्थेवरील ताण हा चिंताजनक आहे. एखाद्या युद्धप्रसंगी शेवटी जनतेलाच सैनिक बनून शत्रूशी लढावे लागते तसे हे ‘युद्ध’ सुरू झाले आहे, असेही शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.

राज्यात मिनी लॉक डाऊन जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्वच विरोधी पक्षांशी चर्चा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. श्री. फडणवीस व राज ठाकरे यांनी कोरोनाशी सामना करण्याबाबत सरकारला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिल्यावरच मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. राज्यात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले. लोक किती बेफिकीर किंवा बेशिस्त आहेत याचे दर्शन कालच्या रविवारी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडले. एका बाजूला कोरोना भयानक पद्धतीने वाढतो आहे, त्याच वेळेला रविवारी संध्याकाळी जुहूच्या चौपाटीवर कशी प्रचंड गर्दी उसळली आहे याची छायाचित्रे मुंबईतील काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली आहेत. पुण्यातील मंडया आणि बाजारपेठांत तर पाय ठेवायला जागा नाही. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाही समोरची विनामुखपट्टय़ांची अतिउत्साही गर्दी पाहून स्वतःच्या नाकातोंडावरील ‘पट्टी’ काढून भाषण करण्याचा मोह आवरला नाही. समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असेच बहुतेक पुढाऱयांना वाटू लागले आहे. तिकडे पश्चिम बंगालातही निवडणूक प्रचाराची रणधुमाळी पाहता तेथेही त्यात कोरोना चिरडला गेला आहे का, अशी शंका येते. ‘‘पंतप्रधान मोदी, तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात काय? कोण आहात तुम्ही?’’ असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी त्राग्याने विचारला तो खराच आहे. मोदी हे नक्कीच परमेश्वराचे अवतार नाहीत. तसे असते तर त्यांनीही जादूच्या छडीने छुमंतर करून कोरोनाचा पराभव केला असता, पण आपण सत्तेवर विराजमान झालेले एक साधारण मनुष्यप्राणीच आहोत याचे भान ठेवून मोदी यांनीही कोरोनाच्या दुसऱया लाटेशी लढण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला. 6 ते 14 एप्रिलपर्यंत एक मोहीम राबविण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच या महामारीला रोखण्यासाठी व्यवस्थापन आणि सामाजिक जागरुकता वाढविण्याबरोबरच लोकसहभाग आणि जनजागृती सुरू ठेवण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी टेस्टिंग (चाचणी), ट्रेसिंग (तपास), ट्रीटमेंट (उपचार), कोविड प्रतिबंधक खबरदारी आणि लसीकरण ही पंचसूत्री अवलंबण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रात हे उपक्रम सुरूच आहेत. कोरोनाविरुद्ध एकत्र लढण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत याबद्दल ज्यांना राष्ट्रीय पातळीवर राजकीय चिंता वाटते त्यांनी महाराष्ट्राने लसीकरणाबाबत केलेल्या विक्रमाचीही नोंद घ्यायला नको काय? शनिवारी एकाच दिवशी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली याबद्दल महाराष्ट्राची पाठ दिल्लीश्वरांना थोपटावीच लागेल. कोरोनाचा कहर फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात आहे. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनीही ‘टेस्टिंग’ आणि ‘ट्रेसिंग’चा पाठपुरावा केला तर अनेक राज्यांत कोरोना आकडय़ांचा कडेलोट होईल, पण जेथे निवडणुका आहेत तेथे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोविड-कोरोनाचे नाव काढायचे नाही असे जणू आदेशच सरकारी यंत्रणांना मिळालेले दिसतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरांनी वेळीच निर्बंध स्वीकारले असते तर नक्कीच आकडय़ांची घसरण दिसली असती. येथे सरकार कमी पडते आहे, असे नाही, असे म्हणत शिवसेनेने राज्य सरकारची पाठराखणही केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button