चिदंबरम यांना अटक; पुढचा नंबर कुणाचा?

p-chidambaram

badgeदेशाचे गृहमंत्री राहिलेले काँग्रेसचे ७३ वर्षे वयाचे नेते पी. चिदंबरम यांना एका घोटाळ्याच्या मामल्यात बुधवारी रात्री सीबीआयने त्यांच्या घरी ऊन अटक केली. त्यामुळे देशाचे राजकारण तापले आहे. काँग्रेसमध्ये तर खळबळ आहे. ‘मोदी आता कुणाला उचलणार?’ अशी चर्चा लोकांमध्ये रंगते आहे.
काँग्रेसच्या राज्यात सीबीआयची एवढ्या मोठ्या माशाला हात लावण्याची हिंमत झाली असती? नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर सफाई मोहीम जोरात सुरू आहे. अनेक मोठमोठ्यांचे बुरखे फाटत आहेत. स्नानगृहात सारे नग्न असतात. राजकारण
हा कोळशाचा धंदा झाला आहे. सारे कबूल. पण सामान्य माणूस ज्यांच्याकडे आशेने पाहतो त्यांना पिंजऱ्यात उभे राहावे लागते याचा अर्थ आपली राजकीय व्यवस्था कुठेतरी मार खाते आहे.

नऊ वर्षांपूर्वी सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सीबीआयने अमित शहा यांना अटक केली तेव्हा पी. चिदंबरम हे गृहमंत्री होते. काळाचा महिमा पाहा. सीबीआयने चिदंबरम यांना काल रात्री त्यांच्या घरी जाऊन अटक केली तेव्हा अमित शहा गृहमंत्री आहेत. चिदंबरम यांच्यावरची कारवाई सूडबुद्धीची असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. विरोधी पक्ष तसे बोलणारच. पण न्यायालयाच्या देखरेखीखाली मामला सुरू असताना तसे कसे म्हणता येईल? आयएनएक्स मीडिया नावाच्या एका कंपनीला ४ कोटी ६२ लाख रुपये विदेशातून उभे करायला परवानगी असताना तिने ३०५ कोटी रुपये उभे केले आणि मग हे प्रकरण निस्तरताना भानगडी झाल्या असे हे प्रकरण आहे. ह्या कंपनीच्या संचालक इंद्राणी मुखर्जी नावाच्या महिलेने सीबीआयला दिलेल्या कबुलीवरून चिदंबरम पितापुत्र अडचणीत आले आहेत. तपासात सत्य काय ते बाहेर येईल. पण चिदंबरम पहिल्याच दिवशी निमूट सीबीआयला सामोरे गेले असते तर एवढे महाभारत झाले नसते. दोन दिवस त्यांचे बेपत्ता राहणे लाजिरवाणे होते. नेत्यांना तुरुंगात जावे लागण्याची ही पहिली वेळ नाही. लालूप्रसाद यादव, जयललिता, ओमप्रकाश चौटाला आदींनी तुरुंग पाहिला आहे. लालू तर अजूनही तुरुंगात आहेत. पण एक अभ्यासू, सुसंस्कृत नेता म्हणून चिदंबरम यांची प्रतिमा होती. तिलाच आता छेद जाण्याची भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आक्रमण चिदंबरम झेलत होते. आता त्यांचीच पळापळ सुरू असल्याने काँग्रेसच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्यामागे तर फार आधीपासून तपास यंत्रणा लागल्या आहेत. एकूणच काँग्रेसचे ‘बुरे दिन’ सुरू आहेत.

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असा नारा मोदींनी सत्तेत येताना दिला होता. हा नारा केवळ विरोधकांसाठी नाही हे दाखवून देण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर आहे. विरोधी नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते अशी ओरड आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेले भाजपत येऊन पवित्र होऊ पाहतात. वाल्याचा वाल्मीकी होत असेल तर कुणाला वाईट वाटण्याचे कारण नसावे. पण घोटाळेबाजांना हाताळताना कठोरच असले पाहिजे. तपास यंत्रणांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे.