छोटा शकील, टायगर मेमन, भटकळ बंधूंसह १८ जण दहशतवादी घोषित

केंद्रीय गृह मंत्रालयाची अधिसूचना

Chhota Shakeel, Tiger Memon, Bhatkal brothers

नवी दिल्ली: बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्याचा (Unlawful Activities (Prevention ) Act) आधार घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने छोटा शकील, टायगर मेमन, रियाझ आणि इक्बाल भटकळ बंधू, जावेद चिकना यांच्यासह १८ जणांना मंगळवारी ‘दहशतवादी’ (Terrorist) घोषित केले. सन १९६७ मध्ये हा कायदा केला गेला तेव्हा त्यात फक्त एखाद्या संघटनेला ‘दहशतवादी संघटना’ (Terrorist Organisation) म्हणून जाहीर करण्याची तरतूद होती.

गेल्या वर्षी मोदी सरकारने कायद्यात दुरुस्ती करून अशा संघटनांशी संबंधित व्यक्तींनाही ‘दहशतवादी’ घोषित करण्याची तरतूद केली. त्यानुसार याआधी मोलाना मसूद अझर, हाफीज सईद, झकी-उर-रहमान लक्वी व दाऊद इब्राहीम यांच्यासह नऊ खलिस्तानी नेत्यांचा दहशतवादी व्यक्तींच्या  यादीत समावेश केला गेला होता. मंगळवारी काढलेल्या अधिसूचनेने या यादीत आणखी १८ नावे समाविष्ट केल्याने एकूण व्यक्तिगत ‘दहशतवादी’ ३२ झाले आहेत.

मंगळवारी घोषित केलेले दहशतवादी असे : साजिद मिर, युसूफ मुजम्मील बट, अब्दुर्रहमान मक्की, साहीद मेहमूद रहिमतुल्ला, फरहतुल्ला घोरी ऊर्फ अबू सुफियान, मुफ्ती अब्दुल रऊफ असगर, जावेद अमजद सिद्दिकी, युसूफ अझर, शाहीद लतीफ, सैयद सलाहुद्दीन, गुलाम नबी खान, जफर हुसैन भट, रियाझ भटकळ, इक्बाल भटकळ, छोटा शकील, इब्राहीम अब्दुल रझ्झाक ऊर्फ टायगर मेमन आणि जावेद दाऊद टेलर ऊर्फ जावेद चिकना.

हे दहशतवादी याआधी ‘दहशतवादी संघटना’ म्हणून जाहीर केलेल्या लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, इंडियन मुजाहिदिन व इतर संघटनांशी संबंधित असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या संघटनांनी व त्यांच्या या हस्तकांनी भारतात कोणकोणती दहशतवादी कृत्ये केली आहेत याची माहितीही अधिसूचनेत दिलेली आहे. गृह मंत्रालयाच्या या निर्णयाविरुद्ध संबंधित व्यक्ती किंवा संघटना केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ‘फेरविचार समिती’कडे (Review Commitee) दाद मागू शकतात.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

.