शूरवीर छत्रपतींचा ‘रायगड’ किल्ला

महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. महाराष्ट्रात आहेत तसे आणि तितके किल्ले जगात अन्यत्र नाहीतच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास ह्या किल्ल्यांसोबत  आजही बोलका करतात. हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देताताच तसेच गिर्यारोहण व पर्यटन यादृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील या किल्ल्यांचा परिचय प्रत्यकाने करून घ्यायला हवा….या किल्लांपैकी एक आहे ‘रायगड’ किल्ला…

‘रायगड’ हा शिवकालातील महत्त्वपूर्ण किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ मध्ये हा गड बांधून घेतला. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड! छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९७, आनंदनाम संवत्सर, जेष्ठ शु. त्रयोदशी, शनिवार (६ जून, १६७४) रोजी जो राज्याभिषेक झाला, तो याच रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसन रायगडावरच झाले. म्हणून या गडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड (कुलाबा) जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणार्‍या या गडाच्या सभोवताली दाट जंगले आहेत. त्यामुळे लांबून गडाचे दर्शन अतिशय विलोभनीय दिसते.

छत्रपती शिवाजी राजांची समाधी रायगडावर असून गडावर अनेक इतर ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यात विशेष करून महाराजांची सदर, दरबाराची जागा, हिरकणी बुरूज, भवानी टोक, छत्रपतींच्या वाड्याचा चौथरा, बाजारपेठेचे अवशेष इ. महत्त्वाच्या वास्तू आहेत. गडाला सुमारे १४०० पायर्‍या आहेत. ज्या शिवभक्तांना गडावर चालत जाणे शक्य नाही, अशांसाठी आता ‘रायगडावर’ रोपवेची सोय करण्यात आली आहे. गडावर राहण्याची व भोजनाची उत्तम प्रकारे सोय आहे. गडाच्या पायथ्याशी पाचडला मातोश्री जिजाबाईंची समाधी आहे. महाडपासून २७ कि. मी. अंतरावर असणार्‍या रायगडावर जाण्यासाठी महाडपासून गाड्यांची सोय आहे. श्रेष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला, तसेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची येथूनच सुरुवात केली. जर तुम्ही महाराष्ट्र दर्शन करत असाल तर हा किल्ला अवश्य बघा….