राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले होत असेल तर; उदयनराजेंचा इशारा

chhatrapati-udayan-raje-got-angry-attack-akshay-borhade

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये या तरुणाने दावा केला आहे की, शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्यावर मारहाणीचे आरोप लावले आहेत. खुद्द भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

अक्षय बोऱ्हाडे असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाण केल्याचा आरोप लगावला आहे. गेल्या ३ वर्षापासून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम केलं, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझं कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केली. मी केलेले आरोप खोटे असेल असं वाटत असेल तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा, त्याच्यापुढे जाणाऱ्या माणसांना मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला.हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याची दखल घेतली.

याबाबत उदयराजेंनी फेसबुकवर पोस्ट केली आहे की, जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधार देणारा युवक अक्षय बोऱ्हाडे याला काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वताचे आयुष्य वाहून घेण्याचं काम या तरुणाने केलं. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असं ते म्हणाले.

तसेच पोलीस प्रशासनास आवाहन करतो की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता लवकरात लवकर या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करून या युवकास न्याय मिळवून द्यावा. सामाजिक जीवनात काम करत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो हे सर्वज्ञात आहे परंतु कोण राजकीय द्वेष तसेच वैयक्तिक कारणास्तव याप्रकारचे हल्ले करत असेल तर हे हल्ले महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीस नक्कीच विचलित करणारे असतील असा इशाराही उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER