नागरेचे ३ बँकांची खाती सील

NCP Chhabu Nagre

नाशिक : बनावट नोटा छपाई प्रकरणात अटकेत असलेल्या छबू नागरेची 3 बँक खाती सील करण्यात आली आहेत. छबू नागरेचे विश्वास बँक, हैदराबाद बँक आणि स्वत:च्याच मायक्रो फायनान्स पतसंस्थेत खाती होती. ही तिन्ही बँक खाती पोलिसांनी सील केली आहेत. तसंच या खात्यांमधील साडे सात लाख रुपयेदेखील पोलिसांनी जप्त केले आहेत.

राष्ट्रवादीचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या छबू नागरेला 1 कोटी 35 लाखाच्या बनावट नोटांसह अटक करण्यात आली होती. त्याच्यासह अकरा जणांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कारवाई करुन 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या. तसंच छबू नागरेसह 11 जणांना अटक केली. राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या छबू नागरे याच्या खुटवडनगरमधील एका फ्लॅटमध्ये नोटा छपाईचं सामान आढळलं. फ्लॅटमधून पेपर कटिंगचे कटर, 2 प्रिंटर,1 स्कॅनर, आणि वेगवेगळ्या रंगाच्या शाई सापडल्या.

बनावट नोटा मार्केटमध्ये आणण्यासाठी नागरे आपल्या अॅक्सेस मायक्रो फायनान्स पतसंस्थेचा वापर करायचा, असा संशय आहे. दरम्यान छबू नागरेवर देशद्रोहाचा खटला दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.