लवंग चघळा मुख दौर्गंध्य दूर ठेवा!

मुखशुद्धीकरीता लवंग घेणे हे बऱ्याच लोकांना नित्याचे असते. लवंग पदार्थाला सुगंध आणण्याकरीता किंवा घरगुती उपचार म्हणून वापरण्यात येते. पुलाव बिर्याणी, साखरभात नारळीभात किंवा विड्याचे पान यात लवंग हमखास वापरण्यात येते. देवकुसुम, श्रीप्रसून, चंदनपुष्पक, वारिज अशी विविध पर्यायी नावे आयुर्वेदात लवंगाकरीता आले आहेत. लवंग कलिका स्वरुपात प्रयुक्त होते. वाळवून या बाजारात उपलब्ध होतात. औषधी प्रयोगार्थ लवंग आणि त्या पासून काढण्यात येणारे तेल उपयोगी आहे.

ही बातमी पण वाचा:- औषधी निर्माण – आयुर्वेदाची संपन्नता !

जेवणानंतर नित्य दिनचर्येमधे जेवणानंतर लवंग युक्त तांबूल सेवन मुख शुद्धीकर व लाळ स्वच्छ करणारे मुख दौर्गंध्यनाशक सांगितले आहे.

लवंग रुचि उत्पन्न करणारे आहे. पाचन करणारे आहे. तीक्ष्ण तिखट कडू रसाचे असल्याने लालास्त्रावी ग्रंथींना उत्तेजित करणारे आहे. त्यामुळे लालास्त्राव जास्त होतो व मुखशुष्कता कमी होते. त्यामुळे तोंड वारंवार कोरडे पडत असेल व तहान लागत असेल तर लवंग चघळावी. उगीचच पाणी पिण्याची सवय नष्ट होते शिवाय अन्नाचे पाचन होते. सुगंधी असल्याने मुख दौर्गंध्य दूर होते. चिवट च्युइंगम माऊथ फ्रेशनर, ज्याला काहीही औषधीगुण नसतात, खाण्यापेक्षा लवंग घेणे जास्त फायदेशीर आहे.

लवंग दंतरोग मुखरोग कण्ठरोगावर प्रभावी काम करते. त्यामुळे दात दुखत असेल, दात किडले असतील तर लवंगाच्या तेलाने भिजविलेला कापूस दुखऱ्या दातावर दाबून ठेवल्यास दंतकृमी नष्ट होतात व दात दुखणे बंद होते.

पित्तामुळे जळजळ होणे मळमळ वांती होणे अशा त्रासावर लवंग चघळल्याने आराम पडतो. अर्थात हे सर्व त्रास आहार विहारातील चुकीच्या सवयीमुळे होतात. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वैद्याचा सल्ला अपेक्षित आहे. भूक न लागणे, अति व जड जेवण झाल्याने अजीर्ण होणे त्यामुळे पोट फुगल्याप्रमाणे वाटणे पोट दुखणे अशी लक्षणे उत्पन्न झाली असतील तर लवंग खावी.

मळमळ वांती होणे अशा तक्रारीं करीता लवंग खूपच उपयोगी आहे. प्रवास करतांना काही जणांना असा त्रास होतो त्यावर लवंग चघळणे उत्तम उपाय आहे.

प्रेगन्सीमधे मळमळ खाण्याची इच्छा न होणे किंवा अपचन असे त्रास जाणवत असल्यास लवंग चघळावी. लाळ शुद्ध होऊन वाढलेल्या पित्ताचे शमन होते व जेवण चांगले करता येते.

कफविकार दमा या व्याधींवरील अनेक कल्पांमधे लवंगाचा वापर करण्यात येतो. कारण लवंग श्लेष्महर असल्याने संचित कफ बाहेर काढते व दुर्गंधी दूर करते.

लवंग भाजून त्याचे धूपन घेणे कफ कमी करणारे वातावरणातील आर्द्रता कमी करणारे आहे. वर्षाऋतुमधे घर थंड ओलावा असलेले असते. अशावेळी गोवऱ्यां जाळून त्यावर लवंग ओवा गुग्गुळ अशा द्रव्यांचे धूपन वातावरण शुद्ध करते.लवंगाचे तेल डोकेदुखी सायनस मायग्रेन इ. व्याधीवर कपाळावर लावल्याने आराम पडतो.
तेलाच्या तीव्र सुगंधाने चोंदलेले नाक मोकळे होते.

उचकी येत असेल तर लवंग खाल्याने उचकी थांबते.

आमवात सियाटिकासारख्या व्याधींवर लवंगाचे तेल लावून मालीश केल्यास तात्पुरता का होईना पण आराम पडतो. अर्थात या व्याधी आभ्यंतर दोषांनी होतात त्यामुळे बाह्य उपचार, आभ्यंतर औषधीसह सहाय्यक कार्य करतात.लवंगादि वटी अविपत्तिकर चूर्ण या औषधी कल्पांमधे वापरण्यात येणारी ही बहुगुणी एवढीशी लवंग. आहारात पदार्थामधे किंवा जेवणानंतर नक्की चघळावी.

ayurveda

 

 

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER