चेतन सकारिया म्हणतो, आयपीएल झाले तरच आमची घरे चालतील!

Maharashtra Today

यंदाच्या आयपीएलमध्ये जो एक खेळाडू आपल्या हृदयस्पर्शी कहाणीने सर्वांच्या लक्षात राहिला तो म्हणजे राजस्थान राॕयल्सचा (Rajsthan Royals) चेतन सकारिया (Chetan Sakaria). आयपीएल अर्ध्यातच अणि लवकर आटोपावे लागले हे त्याच्यासाठी चांगलेच झाले कारण त्याचे वडील कोरोना पाॕझिटिव्ह आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे घरी परतल्या परतल्या चेतनच्या दवाखान्याच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत आणि तो सकाळी 9 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत वडील दाखल असलेल्या दवाखान्याबाहेरच थांबून असतो. वडीलांना मधूमेह आणि त्यात कोरोना असल्याने तो अधिकच चिंतीत आहे. या खेळाडूने यंदा राजस्थान राॕयल्ससाठी नवा चेंडू हाताळताना सात विकेट काढल्या. राजस्थान राॕयल्स सलामी गोलंदाजाची जबाबदारी आपल्याला देईल याची आपण कल्पनासुध्दा केली नव्हती असे त्याने म्हटले आहे.

भावनगर जिल्ह्यातील वार्तेज गावचा हा मध्यमगती गोलंदाज. घरी पोहोचल्या पोहोचल्या पीपीई कीट चढवून तो वडील कानजीभाई यांना भेटण्यासाठी दवाखान्यात गेला. तो आयपीएलमध्ये व्यस्त असतानाच गेल्या आठवड्यात त्याचे वडील कोरोना पाॕझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते आणि त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते. सुदैवाने चेतनला राजस्थान राॕयल्सकडून त्याच्या मेहनतान्यातील काही भाग मिळाला आहे. ते पैसे त्याने सरळ घरी दिले असून आता संकटसमयी ते कामा येत आहेत.

चेतनसारखे खेळाडू जे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नसतात आणि ज्यांना मंडळाचा करार मिळालेला नसतो अशा खेळाडूंसाठी आयपीएल हे उत्पन्नाचे मोठे साधन असते. त्यामुळे तो म्हणतो, ” लोक म्हणतात आयपीएल थांबवले पाहिजे. कोरोनाच्या लाटेत खेळवायला नको पण माझ्या घरात मीच एकटा कमावता आहे आणि क्रिकेटमधूनच माझी कमाई आहे. आयपीएलमधून जे काही पैसे मिळाले त्यातूनच मी वडिलांचा उपचार करू शकतोय. ही स्पर्धा महिनाभर का होईना खेळली गेली म्हणून तरी मला काही पैसे मिळाले आहेत,.नाही तर परिस्थिती फार अवघड होती. मी अतिशय गरिबघरचा मुलगा आहे. माझे वडील रिक्षा (टेम्पो) चालवायचे.पण आता आयपीएलमुळे माझे आयुष्य बदलणार आहे. चेतन सकारियाला यंदाच्या आयपीएलमध्ये एक कोटी 20 लाख रुपयांची किंमत मिळाली आहे.

आयपीएलमध्ये करोडपती बनण्याचा त्याला आनंद तर होताच पण त्यालासुध्दा दुःखाची किनार होती. कारण आयपीएलमध्ये ही किंमत मिळायच्या काही महिने आधीच त्याला अतिशय प्रिय असलेला त्याचा लहान भाऊ देवाघरी गेला होता. आपल्या भावासाठी आपण काहीच करू शकलो नाही याचे दुःख त्याला आहेच.

आयपीएलच्या अनुभवाबद्दल तो सांगतो की कर्णधार संजू सॕमसनने त्याल सुरुवातीलाच सांगितले होते की संघ व्यवस्थापनाला त्याच्यात भरपूर काही क्षमता असल्याचे वाटते म्हणून सामना खेळण्यासाठी तयार रहा. ते ऐकून मला रात्रभर झोप लागली नव्हती. कशी गोलंदाजी करायची याचाच विचार करत होतो. आपल्या पदार्पणातच त्याने पंजाब किंग्जविरुध्द 31 धावात तीन विकेट काढल्या होत्या आणि चेन्नई सुपर किंग्जविरुध्द तर त्याने महेंद्रसिंग धोनीला बाद केले होते. रोहीत शर्मानेही आॕटोग्राफ देताना त्याची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे सांगत त्याचे कौतुक केले होते. आता आयपीएलचे उर्वरीत सामने लवकरात लवकर व्हावेत अशी त्याची इच्छा आहे कारण क्रिकेट हेच त्याच्या कमाईचे साधन आहे. वडिलांना सुखरूप घरी आणल्यानंतर नवे घर बांधायचे त्याचे स्वप्न आहे पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी आयपीएलचे सामने होणे जरूरी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button