बुद्धिबळाच्या खेळात बाबांना हरवणे अशक्य – सुप्रिया सुळे

Supriya Sule and Sharad Pawar

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेशी जुळलेल्या लोकांनाच घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली असून, सामान्य नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री केलं आहे. त्यामुळेच सामान्यांपासून ते अनेक बडी नेतेमंडळी, खेळाडू, कलाकारही घरीच आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आपल्या मुंबईतील घरामध्ये कुटुंबाबरोबर निवांत वेळ घालवणाऱ्या शरद पवारांचा व्हिडीओ त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच पोस्ट केला आहे. ‘बाबांसोबत बुद्धिबळाचा डाव खेळणं सोपं नसतं. ’ असे कॅप्शन या व्हिडीओला सुळे यांनी दिले आहे.

राजकारणातील दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जाणारे शरद पवार या व्हिडीओमध्ये बुद्धिबळ खेळताना दिसत आहेत. सुळे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पवारांची नात म्हणजेच रेवती हे बुद्धिबळ खेळताना दिसत आहेत. “करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आम्ही सर्वजण घरात आहोत. आम्ही दुपारी बुद्धिबळाचा डाव मांडला. थोड्या वेळातच बाबांनी आम्हा मायलेकींना हरवलं. ” असं सुप्रिया यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच पवार कुटुंब घरी एकत्र काय करत आहे याची माहितीही सुप्रिया यांनी या कॅप्शनमध्ये दिली. “आम्ही पुस्तकं वाचतोय, कुटुंबासोबत वेळ घालवतोय. ” असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी इतरांना तुम्हीही घरीच थांबा सुरक्षित राहा, असा सल्लाही सुप्रिया यांनी दिला आहे.