बंदी असूनही दुसऱ्याच नावाने खेळणाऱ्या बुध्दिबळपटूची लबाडी उघड

Cheater Chess player exposed.jpg

म्हणतात की, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. लाटव्हियाचा (Latvia) बुद्धिबळपटू (Chess) इगोर्स रॉसीस (Igors Rausis) याच्याबद्दलही असंच काहीसं झालंय आणि त्याच्या कृत्यांसाठी बुद्धिबळाच्या इतिहासात त्याचे नाव कायमचे नोंदले जाईल.

५९ वर्षे वयाचा हा बुद्धिबळपटू, ग्रँडमास्टर (Grandmaster) दर्जाचा… प्रगल्भ वय आणि ग्रँडमास्टर दर्जाची गुणवत्ता पण ह्या गड्याने गेल्या वर्षी आणि आता तीन दिवसांपूर्वी असे  काही कृत्ये केली की विचारू नका!

इगोर्सवर आधीच बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान फसवणूक व लबाडी केल्याप्रकरणी सहा वर्षांची बंदी आहे. त्याचे ग्रँडमास्टरपद त्याला गमवावे लागले आहे आणि आता खेळायला बंदी असतानाही दुसऱ्याच नावाने बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्याचा त्याचा कारनामा उघड झाला आहे. त्याचे हे कारनामे बघून कुणी बाप रे बाप ! म्हटले नाही तरच नवल.

रॉसीस हा गेल्यावर्षी जुलैमध्ये स्ट्रासबोर्ग ओपन (Straussbourg Open) स्पर्धेत फसवणूक करताना पकडला गेला होता. स्पर्धेदरम्यान प्रसाधनगृहात मोबाईल वापरण्याची व त्यावरुन मदत घेण्याची चोरी पकडली गेली होती. त्याने स्वतः या फसवणुकीची कबूली देत निवृत्तीची घोषणाही केली होती. तरीही त्याचे ग्रँडमास्टरपद रद्द करण्यात आले. त्याच्यावर सहा वर्षे बंदी घालण्यात आली. फिडे मानांकन स्पर्धात त्याला भाग घेण्यास बंदी करण्यात आली. बऱ्याच वर्षांच्या संशयानंतर आणि त्याच्या डावांच्या विश्लेषणानंतर पाळत ठेवून त्याची लबाडी उघड करण्यात आली होती पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीनुसार काही महिने शांत बसल्यावर त्याचे आणखी एक गैरकृत्य समोर आले आहे.

ताज्या घटनेत बंदी असतानाही तो शनिवारी लाटव्हियातील एका रॕपिड स्पर्धेत सहभागी झालेला दिसून आला. मात्र इगोर रॉसीस या नावाने तर तो खेळू शकत नव्हता म्हणून तो दुसऱ्याच नावाने सहभागी झाला. तरी त्याची चोरी पकडली गेली. लाटव्हियाच्या एका ग्रँडमास्टरने त्याच्याविरोधात तक्रार दिली आणि आपली लबाडी उघड झाल्यावर त्याने माघार घेतली. दोन दिवसांची ही स्पर्धा लाटव्हियाची राजधानी रिगानजिकच्या व्हाल्का शहरात होत होती. एक हजार युरो बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत केवळ 37 स्पर्धकच सहभागी झाले होते.

त्यात तिसऱ्या फेरीआधी इगोरची लबाडी उघड झाली. ग्रँडमास्टर आर्थर नीकसान्स , जे विजेतेपदाचे दावेदार होते, त्यांना लक्षात आले की इसा कासिमी नावाने सहभागी झालेल्या खेळाडूबाबत काहीतरी गडबड आहे. त्यांना शंका आली की हा इसा कासिमी हाच बहुधा इगोर राॕसीस आहे. कोरोनामुळे चेहऱ्यावर मास्क लावावा लागत असल्याने इगोर उर्फ इसा हा ओळखू येत नव्हता. पण इसा हा आपली ओळख लपवण्याचा प्रयात्न करतोय हे नीकसान्स यांच्या लक्षात आले होते. यावरुन त्यांनी तक्रार केली आणि इगोर उर्फ इसा ह्याला माघार घ्यावी लागली.

ही स्पर्धा फिडे मानांकित नव्हती याचा फायदा घेत इगोर उर्फ इसाने हे धाडस केले होते. स्पर्धा आयोजकांनी ‘फिडे’कडून मान्यता घेण्यास उशीर केल्याने या स्पर्धेला मानांकन मिळू शकले नव्हते त्यामुळे इगोर साहभागी झाला होता आणि फिडे मानांकित स्पर्धा नसल्याने तो भाग घेऊ शकत होता. त्याला खेळू द्यायचे कीनाही याचा निर्णय आयोजकांनी घ्यायचा होता.

दरम्यान, इगोर रॉसीसचा इसा कासिमी कसा झाला याबद्दल स्वतः इसाने सांगितले की, जुलै २०१९ मधील प्रकरणामुळे बदनामी झाल्याने आणि प्रसाधनगृहातील त्याचे मोबाईल हाताळतानाचे फोटो सर्वत्र झळकल्याने त्याने आपले नाव बदलले होते. कासिमी हे त्याच्या माजी पत्नीचे आडनाव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER