फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच मिळणार स्वस्त वीज; बावनकुळे

Chandrashekhar Bawankule

मुंबई :- राज्य वीज नियामक आयोगाने १ एप्रिलपासून वीज बिलात २ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला याबाबतचे आदेश आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या धोरणामुळेच राज्यातील नागरिकांना वीज स्वस्त मिळणार आहे, असा दावा भाजपाने (BJP) केला आहे.

या दरकपातीचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केली. ते म्हणालेत, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पुढील पाच वर्षातील वीज उत्पादन व खरेदी संदर्भातील अहवाल वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची पद्धत सुरू झाली. त्यानुसार, ऑक्टोबर २०१९ मध्ये हा अहवाल आयोगासमोर सादर केला. या अहवालाला मार्च २०२० मध्ये आयोगाने मंजुरी दिली. या अहवालात १ एप्रिल २०२१ पासून वीजदर २ टक्क्यांनी कमी करता येईल, असे नमूद केले होते.

“फडणवीस सरकार सत्तेत असताना पाच वर्षाच्या कालावधीत ऊर्जा खात्याच्या धोरणात बदल करताना भारनियमन मुक्त महाराष्ट्र, पायाभूत सोयी-सुविधांचा विकास असे धोरण ठेवून निर्णय घेतले गेले. राजकीय हस्तक्षेप न करता ज्या कंपनीचा वीज दर कमी आहे, त्या कंपनीकडूनच वीज विकत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे महावितरण, महा पारेषण या वीज कंपन्यांची कार्यक्षमता वाढली. परिणामी कंपन्यांचाही नफा होऊ लागला. भाजपा सरकारने दूरदृष्टी ठेवून आखलेल्या धोरणांमुळे जनतेला १ एप्रिल पासून २ टक्के स्वस्त दराने वीज उपलब्ध होणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीसांनी केली मागणी;  अजितदादांनी बोलावली तातडीची बैठक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER