
महाराष्ट्राचे लोकनेते शरद पवार (Sharad pawar) यांनी आज वयाची ८० वर्षे पूर्ण केली आणि ते ८१ व्या वर्षात प्रवेश करीत आहेत. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारणात समरस झाले. पवार हे एक अजब रसायन आहेत. शेतीपासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत असा एकही विषय नाही ज्यावर पवार यांचा अभ्यास नाही. लहान गावांमधील सरपंच आलाय ते ओळखतात आणि बिल क्लिंटनपासून ओबामापर्यंत सर्वांशी त्यांची मैत्री आहे. पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणतात तेव्हा पवार यांची महती लक्षात येते.
डॉ. मनमोहन सिंग (Manmohan singh) सरकारची शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींची कर्जमाफी, हे पवार यांचे कृषिमंत्री म्हणून चर्चेत राहिलेले सर्वांत मोठे योगदान. खरे तर त्यापेक्षा अधिक मोठे योगदान, आयातीसाठी ओळखला जाणारा भारत शेतमालाचा सर्वांत मोठा निर्यातदार बनला हे आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यावेळी शेतकऱ्यांना लाभार्थी बनविण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. शेती कर्जाविषयीचे पुलोद सरकारच्या काळात त्यांनी बंडिंगच्या कर्जाचे नऊ कोटी रुपयांचे व्याज माफ करून सुरुवात केली होती. मात्र वारंवार कर्जमाफी हा शेती व शेतकरी संकटातून बाहेर काढण्याचा कायमस्वरूपी उपाय नाही, हे त्यांनी वारंवार बोलून दाखविले.
१९९३ साली लातूर भूकंपावेळी ते मुख्यमंत्री होते. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकला होता. स्वयंसेवी संस्थांना गावांचे वाटप करून काम करण्याबाबत ते मार्गदर्शन करीत. भूकंपात अनेक लहानग्यांचे आई-वडील मृत पावले होते. काही बेघर झाले. अशा मुलांच्या मानसिकतेवर भूकंपाचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पवारसाहेबांच्या कानावर घातले गेले. तसेच भूकंपग्रस्त १२०० मुलांना पदवीपर्यंत शिक्षण देण्यासाठी पुण्यात आणण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावास नोकरशहांकडून कडाडून विरोध झाला. असे असतानाही पवारसाहेबांनी या प्रस्तावास मान्यता दिली. इतक्यावरच न थांबता पिंपरी-चिंचवड महानगपालिकेची एक नवी इमारत त्यांनी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली. या मुलांना भेटण्यासाठी पवारसाहेबांनी अनेकदा या प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पातील सर्व मुलांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास असणारा, विविध विषयांची माहिती ठेवणारा, विषय समजून घेणारा, त्यावर उपाय योजना करणारा हा देशाचा जाणता राजा आहे. अशा प्रचंड ताकदीचा आणि क्षमतेचा नेता आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावामध्ये आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
शरद पवार हे तब्बल १९७० पासून कुस्तीच्या व पहिलवानांच्या पाठीशी आधार बनून राहिले आहेत. ते १९७१-७२ ला मुंबई तालीम संघाचे अध्यक्ष होते व आज ते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. राज्य मंत्रिमंडळात ते १९७२ ला अर्थ व क्रीडा राज्यमंत्री असताना, महाराष्ट्रातील मल्लांचा संघ तेहरान येथील जागतिक कुस्ती स्पर्धेला निघाला होता. त्या संघात महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार, श्यामराव साबळे (तुरंबे) व दीनानाथ चव्हाण यांचा समावेश होता; परंतु त्यास हरियाणाने हरकत घेतली. मल्लांनी तातडीने पवारसाहेबांना जाऊन भेट घेतली. त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशी बोलून महाराष्ट्राच्या संघाचा त्यामध्ये समावेश केलाच; शिवाय दौऱ्याचा खर्चही राज्य शासनाकडून त्यांनी केला. कुस्तीतील पहिल्या पिढीतील दिग्गज गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे, मारुती माने यांच्यावर त्यांनी अतीव प्रेम केले. हरिश्चंद्र बिराजदार यांच्या आजारपणाचा सर्व खर्च त्यांनी उचलला.
महाराष्ट्रातील अनेक मल्लांच्या आजारपणाच्या काळात त्यांनी पाच-पाच लाखांपर्यंतची मदत केली आहे. वक्तशीरपणा, अथक कार्यमग्नता, अफाट जनसंपर्क आणि सतत जागं असणारं सार्वजनिक संकेतांचं स्थान ही साहेबांची वैशिष्ट्ये अगणित प्रसंगातून सांगता येतील. त्यांच्याबरोबरचा प्रत्येक क्षण म्हणजे शिक्षणाची नवी संधी असते. अखंड, अथक काम करत राहण्याच्या बाबतीत तर साहेबांना कोणीच हरवू शकत नाही. मग ते ९३ चे मुंबईतले बॉम्बस्फोट असोत, किल्लारीतला भूकंप असो, अतिवृष्टी असो की गारपीट. देशाची आर्थिक राजधानी बंद राहिली, की देशाची नाचक्की होईल, हे लक्षात घेऊन साहेबांनी बॉम्बस्फोटानंतर ४८ तासांत मुंबईत रुळावर आणली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं कौतुक झालं.
१९६७ पासून ते थेट २०२० पर्यंत सलग, अथक ५३ वर्षांची संसदीय कारकीर्द उभ्या महाराष्ट्रात कोणाचीही नाही. अफाट जनसंपर्क, विविध विषयांचा सखोल अभ्यास महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक समीकरणांचे बारकावे माहिती असणे, राजकीय निर्णय घेण्याचे अचूक भान, प्रशासनावर आजही असलेली पकड, राजकीय मतभेदापलीकडे जपलेली प्रत्येक पक्षातील मैत्री ही पवार यांची आणखी काही वैशिष्ट्ये. पवार यांच्या यशाचे आणखी एक कारण म्हणजे भूमिकांबाबत त्यांची लवचीकता. एकेकाळी सोनिया गांधींचे नेतृत्व मान्य नसल्याने ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र १९९९ मध्ये भाजप-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेसला साथ दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पवार यांचे हाडवैर प्रसिद्ध होते; पण गेल्या वर्षी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी शिवसेनेला सोबत घेतले.
राज्यात गेल्या वर्षी अशक्य वाटणारे राजकीय समीकरण त्यांनी जुळवले. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची मोट बांधली आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार अशी नोंद त्यांच्या नावे झाली. वयाच्या ८० व्या वर्षी माणूस राजकारणातून निवृत्त होतो. पवार आज लोकप्रियतेच्या आणि सक्रियतेच्या कळसावर आहेत हेच त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला