मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; आमदार राजू पाटील भडकले

MNS Raju Patil - Maharashtra Today

ठाणे :- केडीएमसी हद्दीतील रखडलेल्या पुलासंदर्भात १ एप्रिलला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी ठाकुर्ली पुलावर आंदोलन केले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

“मनसेला कोणीही गृहीत धरू नये. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनून राहू नये. पेलिसांबद्दल नेहमीच आदर आहे; परंतु त्यांनीही पक्षपातीपणा करू नये ही अपेक्षा आम्ही पण करतो. डोंबिवलीत मनसेने केलेल्या आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल केला. आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांच्या उपस्थित वडवली पुलाचे उद्घाटन झाले. तसेच कोपर पुलाच्या लॉंचिंगच्या वेळी गर्दी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे कधी दाखल करणार?” असे राजू पाटील म्हणाले.

पुलांचे काम संथ गतीने

गेल्या काही वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीमधील पुलांचे काम दिरंगाईने सुरू आहे. बर्‍याचदा प्रशासन आणि अधिकाऱ्यांद्वारे वेगवेगळ्या तारखा दिल्या जातात. पण पूल होत नाहीत. ठाकुर्ली, पालवा, माणकोली, दुर्गाडी पुलाचे काम चालूच आहे. यामुळे नागरिक आणि प्रवासी  हैराण झाले आहेत. याचा निषेध म्हणून डोंबिवली पश्चिममधील मनसे कार्यकर्त्यांनी १ एप्रिलला आंदोलन केले. यावेळी ‘एप्रिल फूल, डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवले आमचे कल्याण-डोंबिवलीकरांचे पूल’ अशा घोषणा करत आणि केक कापून मनसेने १ एप्रिलला आंदोलन केले होते. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button