नाटकातील संवादात बदल केल्यास मान्यता रद्द होणार

natak

पुणे (प्रतिनिधी) :- नाटकातील संवादामध्ये बदल आणि अंगविक्षेपांवरील आक्षेप अशा स्वरूपाच्या काही नाटकांच्या तक्रारींमुळे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने (नाट्यसेन्सॉर बोड) यापुढील काळात नाटकाच्या सादरीकरणामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास नाटकाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सादरीकरणात काही आक्षेपार्ह आढळले किंवा काही तक्रार आली तर मान्यता रद्द होऊ शकते, अशी तळटीप संहितेला मान्यता देणा-या पत्रामध्ये यापुढे खास लिहिली जाणार आहे.

नाटक हे समाजामध्ये प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. रंगभूमीवर कोणतीही कला सादर करण्यापूर्वी मंडळाकडून संहिता मान्य करून घेणे बंधनकारक आहे. अनेकदा उद्या प्रयोग असताना ऐनवेळी संहिता मान्यतेसाठी पाठवली जाते. मात्र, संहितेनुसार प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सादर होतोच असे नाही. संवादामध्ये होणारे बदल आणि अंगविक्षेपकांना घेतले जाणारे आक्षेप यामुळे समाजात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्षात सादरीकरण वेगळेच असल्याचे प्रकार घडले आहेत. मंडळाने धोरण लवचिक केले तरीही नियम मोडले जात असल्याचे दिसून आले आहे.

ही बातमी पण वाचा : भारतीय कम्युनिस्ट पक्ष औरंगाबाद मध्यची जागा लढवणार!

मंडळाने घालून दिलेल्या नियमावलीचा भंग होत असेल आणि समाजामध्ये अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असेल तर अशा नाटकांविरुद्ध मंडळाला कारवाई करावीच लागेल, याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले. कोणत्याही सादरीकरणास अटींवर मान्यता देण्यात येते. त्यामुळे नियम न पाळणा-यांच्या संहितांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मंडळ घेऊ शकते, असे मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

संहितांना शक्यतो मान्यता देण्याचे धोरण आहे. लेखकाने संहितेवर कष्ट घेतलेले असतात. कात्री लावणे योग्य नाही, हे आम्हाला कळते; पण आवश्यकतेनुसार नको तो भाग काढावा लागतो. यापुढे संहितेला मान्यता दिल्यानंतर मंडळाचे सदस्य किमान पाच प्रयोग पाहतील, असे नलावडे यांनी स्पष्ट केले.