अनुकरणाच्या सिंचनातूनच बदल झिरपतील

Mansi

मागच्या वर्षी नीलिमा ताईंच्या प्रशांतचे लग्न झाले. सुन शामल , सुरेख आणि हुशार. दोघांचाही परिचयोत्तर विवाह. दोघंही जण चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला होते. प्रशांत आणि श्यामल आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतात. मात्र निलिमाताई आणि त्यांचे मिस्टर त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी असतात. अधूनमधून येतात मुलांकडे. तसाच काय, मुलांना कुणाला कुणाकडे जायला फारसा वेळ नसतोच आजकाल आणि आवडतही नाही. पण शामलची, माझ्या मुलीशी ओळख झाल्यापासून ती काही निमित्ताने आमच्याकडे येते , आणि गप्पाही करते. तिने लग्न झाल्यावर तिचे नाव आणि आडनाव तेच कायम ठेवले आहे. म्हणजे सासर माहेर चे दोन्हीपण नाव नाही लावत, फक्त माहेरचचं लावते.

काल बोलता बोलता सांगत होती, आई यावेळी आल्या तर सांगत होत्या ,”शामल या डाळी मी आता चाळून निवडून ठेवले आहेत. पण अधून मधून एखाद्या विकेंडला एकदा सगळ्या वस्तूंवरून नजर फिरवत जा बरं !कुठे काही खराब वगैरे होत नाही ना पहावे लागत आहे अधून मधून “. मी आईंना सांगितले ,”तुम्ही हे प्रशांतलाही का नाही सांगत ?” त्यावर त्या थोड्या चमकल्या, पण काही बोलल्या नाही. संध्याकाळी प्रशांतलाही त्यांनी तीच धान्य संबंधीची सूचना दिली. तसा प्रशांत आणि मी मिळून सगळं करतो, पण नेहमी स्वयंपाक घरातील सूचना सुनेलाच का सांगितल्या जातात ?

मी तिला थोडा समजावलं,” अगं इतकी समानता, समान अधिकार, मागण्यांची गरज आपल्यासारख्या घरातून नसते .खरंतर अन्याय जिथे होतो, तिथे तर ही जाणीव पोहोचतच नाही. आणि जिथे समजून घेतल्या जात, अन्याय वगैरे नसतो ,तिथे उगीचच आपण बरोबरी करायला जातो असं नाही वाटत का तुला ?

यावर ती म्हणाली, काकू , माझं बघून माझ्या दोन तीन मैत्रिणी मी नाव बदलली नाही. तुम्हाला असं वाटतं, चांगल्या घरातून, सुशिक्षित ठिकाणीही बायकांवर अन्याय होत नाही , असं नाही .आणि मोर्चे काढून बदल करायला तर मी कुठे जाणार आहे. आणि त्यांनी काही फरक पडतो असं मला नाही वाटत. तर माझ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच झिरपत झिरपत बदल घडत जातात याची खात्री आहे मला ! गप्पा मारून त्यादिवशी शामल घरी गेली. माझ्या एवढ्याच वयाच्या नीलिमा ताईंना हे विचित्र वाटलं असेल नक्कीच ! मला त्यांचं मन जाणवल्यासारखं वाटलं मला . पण तरीदेखील कुठेतरी श्यामल च बोलणं पटत होतं. विचारांना प्रवृत्त करत होतं. तिने जी काही दोन चार उदाहरणे बोलून दाखवली त्याने तिचे कौतुकही वाटले.

ती म्हणाली होती, तिच्या एका मैत्रिणीचे मार्केटिंगचे सर आहेत .केबिन मधून सतत टक लावून तिच्याकडे बघत असतात .आसपास असली की अस्पष्ट असं काहीतरी बोलतात पण. तिला थोडं समजवून सांगितलं,की योगायोगाने असे घडत असेल,संशयाने का बघायचे ? ते वयाने खूप मोठे आहेत, त्यावर ती म्हणाली मला कसं तरी वाटतं ते असले जवळ की . त्यांच्याकडे मिटींगला जायचं म्हटलं की अंगावर काटा येतो. यामुळे दुसरी नोकरी घेता येणार का? इतक सोप आहे का दुसरी नोकरी मिळवण ? अनेक कृती अशा घडतात ,पण बहुतांश महिला याबद्दल दाद मागण्याची हिंमत दाखवत नाही ,कारण आपली समाजव्यवस्था कुटुंबेही अशावेळी तिलाच दोषी ठरवतात. हिम्मत देतच नाहीत, उलट तू असे कपडे घालू नको, फार पुढे पुढे करू नको, उगीच कशाला मित्र ! कामाशी काम ठेवावे. मोकळेपणाने वागायचेच कशाला? असं ऐकायला मिळतं. सांगा काकू आता तुम्ही ! सध्याच्या दहा दहा तासांच्या कामाच्या ठिकाणी ,तणावपूर्ण कामे करताना, टीम बनवून काम करताना अशी मैत्री, चांगली नाती ,सकस आणि निकोपपणे जोपासायला हवीत ना!

पुरुष सहकारी व वरिष्ठांशी हे चांगले नाते जप. त्यात स्त्री म्हणून कुठेही कमीपणा येण्याची गरज नाही .वरिष्ठ पुरुष सत्तेचा दुरुपयोग करीत असेल तर, ती चूक तुझी नाही ! तुला अपराधी वाटून घेण्याचीही गरज नाही .असे ठामपणे म्हणायला हवे .पण आजही तसे घडत नाही.

माझ्या एका मैत्रिणीचे एका मुलावर प्रेम आहे. आता त्यांनी लग्न करायचे ठरवले आहे. मैत्रिणीचे करिअर छान आहे. दोघेही परस्परांच्या कुटुंबात पसंतही आहेत. फक्त मुलाच्या घरच्यांना तिने करिअर करू नये असे वाटते. तिची नोकरी करणे त्यांना नकोय. सांगा मार्ग काय? तिने चॉइस कशाचा करायचा . करिअरचा? की प्रेमाचा? मुलाची करियरला ना नाही. घरच्यांना काय करायचंय ? हा अधिकार यांना कोणी दिला ?

माझी एक बॉस सांगत होती. दोन वर्षाच्या बाळासह तारांबळ नको, म्हणून नवरा घरून काम करतो. दिवसभर तो बाळा सांभाळतो. मी घाईघाईने ऑफिसमधून घरी जाते .बाळाकडे आणि पसरलेल्या घराकडे पाहते. रात्री ऑफिसचे काम पूर्ण करते .माझे काम वेळेत पूर्ण होतेच. तरीही, रोज निघतांना सहकाऱ्यांच्या नजरा, घरी घरच्या नी शेजारच्यांच्या ,आणि शेवटी बाळाला टाकुन निघताना माझीच नजर मला बेचैन करून सोडते. पण तिची हुशारी, तिची मेहनत, तिची धडपड कौतुकास्पद नाही का? पण तिला अपराधी वाटावं असंच आसपास का घडतं?

आपल्याकडे पत्नी तरुण वयात गेली किंवा नंतरही तर मुलांना आई किंवा घर सांभाळायला बाई हवी म्हणून मुलाचे तात्काळ लग्न लावण्याचा विचार होतो. पुरुषांच्या शारीरिक गरजेच्या पूर्ततेची जाणीव ठेवूनच हा विचार होत असतो. पण याच जाणिवेतून मुलींचा, तिच्या लग्नाचा विचार कधी होतो ? समाजाच्या रीतीनुसार लग्नाचे वय उलटून गेलेली मुलगी किंवा तरुण वयात नवरा मरण पावला अशी स्त्री, त्यांना मात्र कायम गृहीत धरलं जातं .उलट त्यांच्या एकटेपणाचा फायदा घ्यायला मात्र तत्परता दाखवली जाते. या सगळ्याचा नवीन विचार कोणी करायचा? कधी करायचा?

उलट मध्यमवर्गीय स्त्रिया, मनोकायिक व्याधींच्या अधिक बळी पडतात ते यातूनच ! सामाजिक संकेतांना घाबरून, घाबरून त्या स्वतःच्या भावनांना दाबून टाकण्यातच पुष्कळशी शक्ती घालवतात . आज शामलाची छोटीशी कृती आणि तिचे विचार यांनी मला खडबडून जागं केलं होतं.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER