बदल हळूहळू होणारच…!

Change will happen slowly

कालच यूट्यूब वरील व्हिडिओ बघत होते. कोरोना सारख्या जागतिक संकटकाळामध्ये बदलांना कसं सामोरं जायचं ? यासंबंधीची ऑनलाइन मुलाखत बघितली. आहारातज्ञ डॉक्टर ऋजुता दिवेकर (Dr. Rujuta Divekar) यांची मुलाखत एका वृत्तपत्राच्या व्यासपीठावरून घेतली गेली. त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. अगदी प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून तर “वर्क फ्रॉम होम “करीत असलेल्या महिला सध्या “वर्किंग इन होम “पण त्याचबरोबर करीत आहेत. पण त्यामुळे त्यांच्यात कामाचा ताण खूप वाढला आहे. यामध्ये ऋजुता दिवेकर यांनी सांगितले की, पुरुष जेव्हा स्वयंपाक घरात मदतीला येतात त्यावेळेला प्रत्येक वस्तू ही कुठे ? ती कुठे म्हणून विचारतात. किंवा हे कसं करायचं ? असे त्यांना प्रश्न पडतात. म्हणूनच बायका त्यांना सांगतात, “तू राहू दे मी करते. “आणि मग ते परत वर म्हणू लागतात की, “मदत केली तरी नाही म्हणते ,आणि नाही केली तरी कटकट करते.” यासाठी म्हणून प्रत्येक पुरुषाने दररोज अर्धा तास जर स्वयंपाकघरात घालवला तर स्वयंपाक घरातील कामाचे बारकावे कळायला लागतील अशी सूचना त्यांनी दिली.

मुलाखत ऐकल्यावर मला एक प्रश्न पडला की खरंच पुरुष बदलाला तयार होतील का ?

अलीकडची पिढी खूप बदलली आहे. दोघेजण अक्षरशः बरोबरीने वाटून काम करतात. खूप प्रशंसनीय आहे हे ! पण वर दाखविलेले प्रसंग घरोघरी दिसतात किंवा पंचेचाळीस पन्नाशी तील अनेक माणसे भेटतात की ज्यांना परिस्थितीशी जुळवून घ्यायचं म्हणजे काय हे समजत नाही. घरातील मुले मुली मोठ्या झालेल्या असतात. त्यामुळे त्यांची आई आणि मुली मुले यांचं एक युनिट होऊन ते आपले ऐकत नाही, ही मोठी हे खंत त्या पुरुषांची असते. मित्रमंडळीत हा विषय हसण्यावारी नेला जातो किंवा जनरेशन गॅप म्हणून सोडून दिल्या जातो. पण या दुःखाकडे मूळच्या प्रश्नाकडे बघितलं जात नाही. त्यामुळे ही समस्या दुसऱ्यांची नाही तर स्वतःचीच आहे हे लक्षातही येतं नाही. त्यामध्ये हा बदल किंवा प्रश्न मान्य करणारे पुरुष फारच कमी !

खरेतर परिस्थिती अशी असते की 2020 सालामध्ये जगत असूनही आपण पार काळाच्या पंचवीस तीस वर्षे मागल्या काळामध्ये आपल्या विचारसरणी द्वारे जगत असतो. आजूबाजूच्या सोयींची सुविधांशी जुळवून घेण्याचा बर्‍यापैकी प्रयत्न आपण करतो ऑफिसमध्ये आवश्यक म्हणून कम्प्युटर शिकतो, स्मार्टफोन वापरायला सुरुवात करतो आणि अडचणी आल्याच तर ज्युनिअर ची मदत घेतो.

पण हजारो वर्षांपासून मिळालेला ‘कर्ता ‘असण्याचा आणि “नकाराधिकार हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे “अशी ठाम समजूत सर्वच पुरुष जातीत असते आणि तो मी मिळवणारच असतो स्वतःला बजावून सांगत असतो .खरी समस्या या त्याच्या सेल्फ टॉप मध्ये दडलेली असते. यातून बाहेर पडायचं असेल तर त्यांनी स्वतःलाच मला खरेच बदलायचे आहे का ? हा प्रश्न विचारावा लागेल.

अश्यावेळी त्यांना “मीच का ? “असा प्रश्न भेडसावणार . त्यावेळी त्यांनी विचार करावा की यातील खरी समस्या किंवा त्रासदायक भाग कोणता ? तर त्याचे उत्तर येणार “मी पुरुष आहे म्हणून !”कायद्यामुळे कदाचित आई-वडिलांच्या मालमत्तेत प्रचलित कायद्यानुसार जन्मसिद्ध हक्क असू शकतो पण इतर कोणताही हक्क पुरुष म्हणून वेगळा असूच शकत नाही याचा स्वीकार त्याला करावा लागेल.

लग्न करताना बायको आपल्यापेक्षा वयाने ,शिक्षणाने ,उंचीने आणि पगाराने कमी असलेलीच निवडतात,हे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले असल्याने तू सदैव माझ्यापुढे नमतं घ्यायला हवं हे विचार नकळतपणे पुरुषांच्या मनामध्ये असतात आणि पुरुषी अहंकार जन्माला येतो . जिथे जिथे संधी असेल तिथे तो व्यक्त होतो. कष्टाने आणि सर्जनशीलतेने मिळवलेले यश असेल तर त्याचा जरूर अभिमान असावा, पण अनेकदा तीच संधी केवळ स्त्रीला स्त्री म्हणून मिळाली नसेल तर त्यात पुरुषी अहंकार असण्याचं कारण काय ? पण या ‘मेल इगो ‘ आणि तोही पुरुषाचं कर्तृत्व शून्य असताना ? याला कारण म्हणजे केवळ आपल्या मनोसामाजिक गृहीत धरलेल्या गोष्टी. वडिलांचं एेकल पाहिजे किंवा पत्नीने बरोबरी करू नये, घरातला अंतिम निर्णय पतीचा असणार किंवा गृहिणी असणे म्हणजे कमावतील नसणे यासारख्या गोष्टी गृहीत धरल्यामुळेच पुरुष वर्ग जीवनाच्या विविध टप्प्यांवर अपमान, अनादर ,कमीपणा ,न्यूनगंड, इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती, स्वामित्वाची वृत्ती, मालकी हक्काची भावना अशा अनेक अयोग्य भावनांना सामोरी जात राहतो. मुले ऐकत नाही, पत्नी ऐकत नाही , कनिष्ठानशि मतभेद होता होता पुरुष राग ,घृणा, तिरस्कार या भावनांना बळी पडतात.

मग बदल घडणार कसा ? प्रसिद्ध कुटुंब समुपदेशक श्री .प्रसाद ढवळे म्हणतात की ,यासाठी व्यक्त व्हा ! तयार राहा आपल्या स्वतः त बदल करण्यासाठी ! त्याची सुरुवात पत्नी आणि जवळचा मित्र यांच्यासोबत करा .त्यांच्यासोबत जर केवळ वाद असेल तर संवाद संपलेला असेल मग त्यासाठी कुठलीही गोळी उपयोगाची नाही . फक्त रोज सकाळची सुरुवात पत्नीशी अर्धा तास बोलून करायची. एकत्र चहा घ्यायचा. पण त्यावेळेला पेपर मात्र वाचायचा नाही ,बोललो भलेही निरर्थक वाटलं तरी त्यात रस घ्या, समोरच्याचं बोलणं पटलं नाही तरी त्यावर काही बोलायचं नाही आणि गाडी भांडणाच्या दिशेने जाऊ द्यायची नाही. जाते आहे वाटलं ,तिथेच थांबायचं . पण संवाद मात्र सुरु करायचा. हा त्यांचा उपाय खरोखरच करण्यासारखा आहे .हा सोपा प्रयोग करून बघा खूप हलका वाटेल. बदल हळूहळू होणारच….! पहिलं पाऊल महत्त्वाचं !!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER