भाजपा-शिवसेना एकत्र येण्याबाबत चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

दोन भाऊ वेगळे झाले तरीही नाते तुटत नाही

Chandrakant Patil

मुंबई : भाजपा आणि शिवसेना एकत्र येण्याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज शनिवारी अतिशय सूचक वक्तव्य केले आहे.

दोन भाऊ वेगळे झाले तरीही नाते तुटत नाही, असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाटील यांनी हे वक्तव्य केले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी एकमेकांकडून कधीच काहीही लिहून घेतलेले नाही. काही नात्यांमध्ये लिहून घेतल्या जात नसते.

शिवसेना आणि भाजपाचे नाते तुटलेले नसून, दोन भावांमध्येही भांडणे होत असतात. व्यावहारिक कारणांमुळे दोन भाऊ वेगळे झाले म्हणून, त्यांच्यातील नाते कधी तुटत नसते!


शिवसेनेने सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकारची स्थापन केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून काडीमोड झाला होता. या सार्‍या पृष्ठभूमीवर, शिवसेना युतीमध्ये परत येईल, अशी आशा बाळगणारे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी आज केले, हे विशेष.
आता शिवसेनेकडून यावर काय भूमिका घेतली जाते, ते बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.