शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त आहेत, यात आता कसलीही शंका उरली नाही चंद्रकांत पाटलांची टीका

Maharashtra Today

मुंबई : राज्यात एकाबाजूला कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला राजकारण तापलं आहे. आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवरच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका सुरू असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी “मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते,” असे वक्तव्य केले आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला .

संजय गायकवाड यांच्या या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त आहेत, यात आता कसलीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता गायकवाड’. असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर, कोरोना हाताळण्यात मविआ सरकारचा अपयशी कारभार संपूर्ण देश पाहत आहे. जनतेची काळजी सर्वांनाच आहे आणि मुळात राज्य सरकारपेक्षा केंद्राला जास्त आहे. केंद्राने दिलेली भरमसाट मदत राज्य सरकारला योग्यरित्या वापरताच आली नाही. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे राज्यात मृत्यूतांडव सुरू आहे. अस देखील पाटील म्हणाले आहेत.

दुसरीकडे, मात्र शिवसेनेचे बुलढण्याचे बेशिस्त आमदार संजय गायकवाड या कठीण काळातसुद्धा आपली पातळी सोडताना दिसत आहेत. हे तेच बोलघेवडे गायकवाड आहेत, ज्यांच्यावर अश्लील वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. राजकारण हे राजकारणासारखं असावं. अपशब्द वापरणं, नेत्यांना चुकीचं नाव घेऊन संबोधणं, हे आमच्या राजकारणात बसत नाही. मात्र आपली राजकीय पातळी सोडून जर भाजपा नेत्यांवर पुन्हा टीका केली तर मोबदल्यात तुम्हालाही चपराक मिळेल, एवढं लक्षात असावं. टीका करण्यापेक्षा लसीकरणावर भर द्या. राज्य संकटात आहे, त्यावर तोडगा काढा. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात ; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे बेताल वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button