‘फ्युज’ उडालेले महाविकास आघाडी सरकार – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule

नागपूर : वीज बिल माफीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) खोटं बोलत आहे. हे सरकार फ्युज उडालेले सरकार आहे. या सरकारने १०० युनिट वीज माफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र ११ महिने झाले तरी दिलेलं आश्वासन या सरकारने पाळलं नाही. महावितरण (MSEDCL) महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे, आमच्या सरकारमध्ये तीन्ही कंपन्या फायद्यात होत्या. आमच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी ११ महिन्यात तोट्यात कशी?, असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारने वीजबिल माफीसाठी ५ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी भाजप (BJP) नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. यापूर्वी अनेक वेळा राज्य सरकारने अनुदान दिल्यानंतर वीजबिल माफी झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात भाजपचं सरकार असातना आम्ही पाच लाख वीज कनेक्शन आम्ही दिले आहेत. आम्ही राज्यातील १ कोटी आर्थिक दुर्बल ग्राहकांचे घरगुती वीज बिल माफ करावे, यासाठी चार महिन्यापासून सरकारकडे मागणी करत आहोत. दिल्ली सरकारप्रमाणे १०० युनिटपर्यंत वीज माफ करु, अशी घोषणा सरकारने केली. पण, ११ महिने होऊन अंमलबजावणी का झाली नाही, हा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.

लॉकडाऊन (Lockdown) काळातील गरिबांचं वीज बिल माफ करण्याची घोषणा सरकारने केली होती. पण, वीज बिल माफ केलं नाही. पाच कोटी जनता वीजबिल माफीची जनता वाट पाहत होती. या सरकारनं आता वीज बिल माफ करणार नसल्याची घोषणा केली.

राज्य सरकारने ५९ हजार १४९ कोटी थकबाकी महावितरणवर असल्याचं सांगितलं आहे. याची चौकशीची घोषणा केली आहे. मात्र, त्यापैकी १६ हजार ५२५ कोटींची थकबाकी गेल्या सरकारमधील होती. कृषी पंपांची ४० हजार कोटींची थकबाकी आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांची वीज कापली नाही. उलट विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित वीज कनेक्शन जोडले. या शेतकऱ्यांना वीज देणे चूक असेल तर आम्ही चुक केली हे मान्य करतो. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना ३२ हजार ६६९ एमयू जास्तीची वीज दिली. आमच्या सरकारच्या काळात देशातील सर्वात जास्त वीज उत्पादन आणि वितरणाचा रेकॉर्ड केला, तेव्हा तांत्रिक अडचण आली नाही, पण यांच्या काळात आली. सरकारने लवकर चौकशी करावी आणि एक महिन्यात रिपोर्ट सादर करावा. सरकारनं चौकशी करत राहावे, पण आधी वीज बिल माफी द्या, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

वीजबिल माफ केलं नाही तर सोमवारी संपूर्ण राज्यात वीज बिलाची होळी करण्यात येईल, असा इशार भाजपनं दिला आहे. महावितरणने एकाही ग्राहकांची वीज तोडली तरी भाजप त्याच्यासोबत उभे राहणार आहे, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER