चंद्रकांतदादांना स्वप्न बघण्यातच आनंद मिळतो, त्यावर काय बोलणार – जयंत पाटील

Jayant Patil & Chandrakant Patil

पुणे :- महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात सगळं ठीक सुरू आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्यातच आनंद मिळतो, त्यावर मी काय भाष्य करणार?; अशी मिस्कील टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केली.

माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असं चंद्रकांतदादा म्हणतात. मग पंतप्रधानही लोकसभेचं अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवणार की नाही यावर चर्चा होऊ शकते. कोरोना आहे त्यामुळे पंतप्रधान आणि लोकसभेचे सदस्य एकत्र येऊ शकत नाहीत. हीच परिस्थिती देशातील सर्व राज्यांना लागू होते. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आपण अधिवेशन घेणं थांबवलं आहे.

यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबतही माहिती दिली. लॉकडाऊनबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी रणनीती आखावी लागेल. कोरोनाचं संकट अजून गेलेले नाही. पण परिस्थिती थोडी नियंत्रणात येत आहे. मात्र लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कोर्ट, कचेरी आणि कायद्याच्या स्तरावर काही निर्णय झाले आहेत. त्यातून तोडगा कसा काढायचा यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजितदादा पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात असल्याचं चित्रं रंगवलं जात आहे. काही लोक हे काम करत असून हे दुर्देवी आहे. या मुद्दयावरून सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. याबाबत कायद्याचा अभ्यास करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच काम करावे लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांच्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) दौऱ्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संभाजीराजेंनी सुरुवातीपासूनच भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्व मराठा नेत्यांनी आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न सुरू केले आहे. त्यात संभाजीराजे अग्रेसर आहेत. पण हा प्रश्न केंद्राच्या हातात आहे. लोकसभेत घटना दुरुस्ती करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी सर्वांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत (PM Narendra Modi) भूमिका पोहोचवण्याचं काम संभाजीराजे करत आहेत, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील आहे. तो सुटायला हवा, असा सगळ्यांचाच आग्रह आहे, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button