अचानक काहीही घडेल का म्हणाले चंद्रकांतदादा

Chandrakant Patil

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी, ‘राज्यात अचानक काहीही घडू शकेल’ असे विधान केले आहे. ‘वन फाईन मॉर्निंग’ अचानक काहीतरी होईल, असा अंदाजदेखील वर्तविला आहे. काही लोक चंद्रकांतदादांना गांभीर्याने घेत नाहीत. त्यांची खिल्ली उडवतात पण दादांना जे जवळून ओळखतात ते अशी खिल्ली उडवताना चारवेळा विचार करतील. दादा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तर आहेतच शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे ते निकटवर्ती आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. दादांनी केवळ हवेत गोळीबार केल्यासारखे विधान केले असेल अशी शक्यता नाही. त्यांना मागचेपुढचे राजकारण कळते, त्या आधारावर ते बोलले आहेत. राज्यात म्हणायला तीन पक्षांचे सरकार आहे पण समन्वयाचा अभाव आहे. अनेक घटनांमध्ये तो दिसून आला आहे. हल्ली हेही प्रकर्षाने जाणवत आहे की परस्परांमध्ये अविश्वासाचेही वातावरण आहे. ‘आमच्या मतदारसंघासाठी निधी मिळत नाही आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना तो जास्त प्रमाणात मिळतो’ अशी तक्रार शिवसेनेच्या अनेक आमदारांनी गेल्या चारपाच दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. स्वत:कडे वित्त विभाग असलेली राष्ट्रवादी काँग्रेस निधीबाबत आपपरभाव दाखवत असल्याची पुष्टी त्यातून मिळते.

शिवसेनेचे उमेदवार ज्या मतदारसंघांमध्ये कमी मतांनी पराभूत झाले तिथेही आपल्या माणसांना बळ देण्याचे काम राष्ट्रवादीकडून केले जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार कमी मतांनी पराभूत झाले तिथे पराभूत उमेदवारांना किंवा पक्षाच्या अन्य नेत्यांना ताकद दिली जात असल्याची काही उदाहरणेदेखील या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याची माहिती आहे. सत्तेचा आपल्या विस्तारासाठी सर्वाधिक चांगला उपयोग सध्या केवळ राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) करवून घेत आहे. शिवसेना त्या बाबत मागे आहे आणि काँग्रेसचे तर विचारूच नका. हा परस्पर अविश्वास आणि एकमेकांशी स्पर्धा करून विस्तार करण्याची राष्ट्रवादीची वृत्ती ही या सरकारला निश्चितपणे अस्थिरतेकडे घेऊन जाईल. राष्ट्रवादीच्या या विस्तारवादी वृत्तीने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने खासदार संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पाठविले नाही ना अशी शंका येत आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी असा कोविडचा सामना करण्यासाठीचा उपक्रम सध्या राज्य शासन राबवित आहे. फडणवीस यांच्या भेटीमागे देखील हाच उपक्रम होता की काय अशी शंका येते. सुशांतसिंग, दिशा सेलियन यांची आत्महत्या, ड्रग्ज प्रकरण, इन्कमटॅक्सकडे पोहोचलेल्या काही फायली यांचा संदर्भही या भेटीच्या अनुषंगाने तपासून पाहिला पाहिजे असे काही जणांना वाटते. सोशल मीडियात तशा प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. केवळ मुलाखतीसाठी नव्हे तर अनेक गोष्टींमध्ये मदत घेण्यासाठी राऊत हे फडणवीस यांना भेटले असावेत असे म्हटले जाते.

बिहारची विधानसभा निवडणूक जवळ येईल तशी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेल्या काँग्रेसची अडचण वाढत जाईल. बिहारी माणसांचा कायम दुस्वास करणाºया शिवसेनेसोबत काँग्रेस बसली आहे याचा प्रचार भाजपकडून बिहारमध्ये केला जाईल. बिहारमध्ये काँग्रेससोबत असलेल्या राजदलादेखील त्या प्रचाराचा फटका बसू शकेल. शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेल्या काँग्रेसने आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, असा सल्ला एमआयएमचे असदुद्दिन ओवेसी यांनी दिला आहे. काँग्रेसला अशा टीकेचा सामना करावा लागेल. महाराष्ट्रातील २० टक्के सत्ता कायम ठेवण्यासाठी देशातील हिंदी बेल्टमध्ये पत गमवायची का, महाराष्ट्रातील सत्तालोलुप मंत्र्यांच्या नादी लागून सत्तेला चिकटून राहायचे की नाही याचा विचार  याचा विचार काँग्रेसला आज ना उद्या करावाच लागेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या अचानक काहीतरी घडेल या भाकिताला मोठा अर्थ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER