‘चंद्रकांता’ ते ‘ग्रेट मराठा’ : इरफानचा संघर्षमय प्रवास

Irfan khans struggling journey

मुंबई : अभिनेता इरफान खान यांनी मोठ्या संघर्षातून बॉलिवूड गाठले. आपल्या आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता इरफान खान आता या जगात नाही. त्यांची अचानक एक्झिट त्यांच्या तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत ते नव्याने इंडस्ट्रीत परतले होते.

मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून इरफानची प्रकृती अधिकच बिघडली होती. तसेच, तीन दिवसांपूर्वीच म्हणजे शनिवारी त्यांच्या आईचे निधन झाले होते. आई जयपूरला असल्याने आणि लॉकडाऊनमुळे इरफान यांना व्हिडीओ कॉलवरच आईचे अंतिम दर्शन घ्यावे लागले होते. काल इरफान यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान इरफान यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान सिनेजगताचे हिरो होते. पण करिअरच्या सुरुवातीला टीव्हीचा पडदाही त्यांनी गाजवला होता. बॉलिवूडआधी इरफान छोट्या पडद्याचे सुपरस्टार होते.

‘श्रीकांत’ ही इरफान यांची पहिली मालिका होती. यानंतर भारत एक खोज, कहकशां, सारा जहां हमारा, बनेगी अपनी बात, चाणक्य, अंगूरी, स्पर्श आणि चंद्रकांता अशा अनेक गाजलेल्या व लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

नीरजा गुलेरी यांच्या ‘चंद्रकांता’ या मालिकेत बद्रीनाथचे पात्र साकारले होते. बद्रीनाथशिवाय त्याचा जुळा भाऊ सोमनाथचीही भूमिका इरफान यांनी साकारली होती. या मालिकेने त्यांचे आयुष्य बदलले.

‘द ग्रेट मराठा’ या पानिपत युद्धावर आधारित मालिकेत इरफानने नकारात्मक भूमिका साकारली होती. ‘लाल घास पर नील घोडे’ या दूरदर्शनवरील एका टेलिप्लेमध्ये इरफानने लेनिनची भूमिका साकारली होती. टीव्ही सीरिज ‘डर’मध्ये सायको किलरची भूमिका साकारली होती. टीव्हीवरचे इरफानचे करिअर जोरात असताना मीरा नायरची नजर त्यांच्यावर पडली आणि तिने ‘सलाम बॉम्बे’ या सिनेमाची आॅफर त्यांना दिली. हा इरफानचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता.

साभार – लोकमत

इरफान खानला बॉलिवूडने अर्पण केली श्रद्धांजली