उद्धव ठाकरे हे पक्ष चालवण्यासाठीच जन्मले – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. प्रशासन चालवणं हा वेगळा विषय आहे. उद्धव ठाकरे यांनी उभं आयुष्य पक्ष चालवण्यात घालवलं. त्यांचा प्रशासनाशी काय संबंध? उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत. त्यांना प्रशासनाशी संबंधित १०० प्रश्न विचारले तर कॉपी करूनही उत्तरं देता येणार नाही, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, उद्धव ठाकरे हे पक्ष उत्तमपणे चालवू शकतात. ते कधी आमदार झाले नाहीत. कधी खासदार झाले नाहीत. कधी नगरसेवकही झाले नाहीत आणि स्थायी समितीचे अध्यक्षही झाले नाहीत. प्रशासन चालवताना कोर्टात हजार प्रश्न घेऊन बसावं लागतं किंवा संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न हाताळण्याचे आदेश द्यावे लागतात. प्रशासनावर वचक ठेवणे ही वेगळी बाब आहे, असं सांगतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षावरच कायम कंट्रोल ठेवला. त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. बाळासाहेबांनी जो नियम पाळला तो उद्धव ठाकरेंनी पाळला नाही. एकदम अंगावर जबाबदारी पडल्यावर असं होतं. त्यामुळेच राज्यातील प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश मिळालं, असं पाटील म्हणाले.

सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. त्यांनी सर्व्हे करावा आणि उद्धव ठाकरे प्रशासनात योग्य आहेत असं वाटते का? असा प्रश्न जनतेला विचारा. लोकही नाहीच म्हणून सांगतील. असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी क्रॉस सबसिडी म्हणजे काय याचा अर्थ मला सांगावा. समोरासमोर बसू. मी शंभर प्रश्न विचारतो. त्यांनी पुस्तक पाहून उत्तरं द्यावीत. पण कोणत्या पुस्तकात उत्तर आहे हेसुद्धा त्यांना सांगता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले. राऊत यांच्याकडे भाजपच्या १०० नेत्यांची नावे असतील तर त्यांनी तातडीने ईडीला पाठवावी. आमचीही राज्यात सत्ता आहे. आम्हालाही चौकश्या लावता येतात, असा इशारा राऊत यांनी दिला होता. त्याचीही पाटील यांनी खिल्ली उडवली. राऊतांचं तोंड कुणी बांधलं? कुणी तुमचे हात बांधलेत? खुशाल चौकश्या लावा. अभिनेत्री कंगना रनौत आणि पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई केलीच ना? तेव्हा तुमचे कोणी हात बांधले होते? त्यामुळे आता कुणी तुम्हाला रोखत आहे? खुशाल कारवाई करा, असं आव्हानच पाटील यांनी राऊतांना दिलं.

ही बातमी पण वाचा : सरकारमधील तिघांच्या वादामुळे मराठा आरक्षणाचे मातेरे झाले; चंद्रकांतदादांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER