चंद्रकांत पाटील यांना होम पीचवरच आव्हान! प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी

Chandrakant Patil

कोल्हापूर :  २०१४ मध्ये जेवढ्या वेगाने भाजपची (BJP) लाट आली तो वेग आता हळूहळू ओसरत तर नाहीय ना, अशी शंका उपस्थित व्हायला लागली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी होताना दिसत आहे. त्यातच आता भाजपमध्ये अंतर्गत मतभेदही दिसून येत आहेत. पहिला निशाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरच लगवण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आता पक्षातूनच करण्यात आली आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यासमोर होम पीचवरच आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

त्यासोबत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितराजे घाटगे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनीही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, असा आरोप कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांमधील लढतीमुळे पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची झाली होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजप या ठिकाणी सहजपणे विजय मिळवेल असा दावा केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा दणदणीत मताधिक्याने पराभव केला होता. याशिवाय, भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या नागपूरमध्येही काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला होता. हे दोन्ही पराभव राज्य भाजपसाठी मोठा धक्का होता.

ही बातमी पण वाचा : पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले ; संजय राऊतांचा भाजपला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER