‘प्रत्येकाला कल्पकता वापरण्याचा अधिकार !’ शिवसेनेच्या डिप्लोमसीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Chandrakant Patil-CM Uddhav Thackeray.jpg

मुंबई : गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जिलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपडा’ असं सांगत गुजराती बांधवांना जिलेबी-फाफडाची मेजवानी देण्याचा शिवसेनेचा बेत चांगलाच यशस्वी झाला आहे. शिवसेनेच्या या ‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’चं (Jalebi Fafda) फलित म्हणून येत्या रविवारी ७ फेब्रुवारी रोजी २१ गुजराती उद्योगपती शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आणि यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रत्येकाला कल्पकता वापरण्याचा अधिकार आहे. शेवटी मतदार सुज्ञ असतो.’ असं चंद्रकांतदादा म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी कल्पकता वापरण्याचा अधिकार आहे. मात्र मतदार सुज्ञ असतो. तात्पुरते करणारे चांगले की देशाच्या हिताचे लाँग टर्म निर्णय घेणारे चांगले, हे ठरवणारी राज्यातील जनता सुज्ञ आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा काही गुंडांसोबत फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चेला ऊत आला आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले की, आम्ही सगळे जनतेमध्ये राहणारे लोक आहोत. अनेक जण येतात, फोटो काढून घेण्याची विनंती करतात. तेव्हा त्यांच्या डोक्यावर लेबल लावलं नसतं की हा कोण आहे, दिवसाला किमान हजार लोक फोटो काढतात. नंतरच्या काळात अशा गोष्टी त्या नेत्याशी जोडणं हे अतिशय हास्यास्पद आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER