तब्येत पवारांची बिघडली, सरकारचे माहीत नाही; चंद्रकांतदादांचे सूचक विधान

पुणे :- “सरकार टिकेल हे तुम्हाला का सांगावे लागते, असे म्हटल्यावर काही तरी गडबड आहे. हे समजून जायचे असते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची तब्येत बिघडली हे माहीत आहे; परंतु सरकारचे मला माहीत नाही.” असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका केली. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकार पाच वर्षे टिकेल, असे म्हटले आहे. यावर तुमचे काय मत आहे? असे चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले. तेव्हा, सरकार टिकेल हे का सांगावे लागते? सरकार टिकेल, हे सांगावे लागते याचा अर्थ काही तरी गडबड आहे. माझी तब्येत बरी आहे, ती बरीच असते. ते सांगावे लागत नाही. तब्येत बरी नसते तेव्हा तुमच्या लक्षात येते. तेव्हा तब्येत बरी नाही हे सांगावे लागते, पवारांची तब्येत बिघडली आहे. सरकारचे मला माहीत नाही, असे चंद्रकांतदादा म्हणाले.

ठरेल तेव्हा कळेल
भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा सवाल यावेळी त्यांना करण्यात आले. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे अंदाज कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत. तुमच्याकडूनही हेच अंदाज समजत आहेत. परंतु ठरेल तेव्हा तुम्हाला कळेल किंवा पहाटेच्या शपथविधीसारखे नंतर कळेल, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा धुरळा उडवला.

लॉकडाऊनला कडाडून विरोध करणार आता राज्याला लॉकडाऊन परवडणार नाही. तुम्ही निर्बंध कडक करा, हरकत नाही. पण लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. आम्ही त्याला कडाडून विरोध करू, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीत बसण्यापेक्षा कपडे बदलून झोपडपट्ट्यांमध्ये जावे, तिथल्या लोकांची परिस्थिती पाहावी. प्रत्येक झोपडीत काही ना काही उद्योग चालत असते. तो बंद झाला तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. राज्यात एक कोटी असंघटित कामगार आहेत. मागच्या वेळी त्यांना काहीच पॅकेज दिले नाही. यावेळी त्यांना पॅकेज देणार नाही आणि घरी बसा म्हणून सांगणार हे चालणार नाही. हे खपवून घेणार नाही, असा इशारा पाटलांनी दिला. तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पॅकेज देण्याची मागणीही त्यांनी केली. दिवसाचे व्यवहार सुरू ठेवावेत. रात्री संचारबंदी लागू करावी. आमचा त्याला विरोध नाही. नाईट लाईफची तशीही आम्हाला गरज नाही. ज्यांना गरज आहे ते तुमच्यासोबत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

पवारांना आराम मिळो
“शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे नवाब मलिक यांचे ट्विट वाचून कळले. पवारांना आराम मिळू दे…, अशी मी महाराष्ट्राच्या कुलभवानीला प्रार्थना करतो.” असे पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button