भारतरत्न सचिन तेंडुलकरचाच नाही, तर भारतीयांचाही अपमान आहे! : चंद्रकांत पाटील

“आपण सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मताशी असहमत किंवा सहमत होऊ शकता, पण आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या अशा खेळाडूचा अपमान तेच करू शकतात, ज्यांची विचारधारा व देशाप्रतीच्या निष्ठेत खोट असेल. हा केवळ भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान नाही, तर भारताचा व प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे.” अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेसवर (Congress) टीका केली आहे.

शेतकरी आंदोलनानंतर अमेरिकन पॉपस्टार रिहाना (Rihanna) यांनी केलेल्या ट्विटची भारतात चर्चा सुरू आहे. त्यात सचिनने ट्वीट करून अप्रत्यक्षरित्या रिहानावर टीका केली. केरळमधील युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या फोटोवर काळे तेल टाकून निषेध केला. यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेत कॉंग्रेसवर जोरदार टीका करत आहे.

“एकदा केरळ येथील युवक कॉंग्रेसने बीफ बॅनविरुद्ध आंदोलन करत असताना गौमातेला भर रस्त्यात कापून टाकल्याचे दृश्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचा केरळ युवक काँग्रेसने केलेल्या अपमानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो!” अशा शब्दांमध्ये पाटील यांनी युवक काँग्रेसच्या कृतीचा निषेध नोंदवला आहे.

तसेच, “राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहेत, हे सर्व जर राहुल गांधींच्या समंतीने घडले असेल तर यापेक्षा लज्जास्पद देशासाठी अधिक काही असू शकत नाही. देश आणि देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही कॉंग्रेसची परंपरा झाली आहे.” असे टीकास्त्र पाटील यांनी काँग्रेसवर सोडले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER