पंतप्रधान मोदी राज्यातलं लोकनियुक्त सरकार पाडणार नाहीत – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता. त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे, असं सांगतानाच राजकारणात टीका होतंच असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माझ्यावर टीका केलेली कशी चालते? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदी लोकनियुक्त सरकार पाडणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला. मी कुणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. शरद पवारांचा अनादर करायचा नव्हता. त्यांना मी नेहमीच आदराने बोलतो. माझ्या वक्तव्याचा संदर्भ समजून घ्या, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकनियुक्त सरकार कधीच पाडण्याचा प्रयत्न करणार नाहीत. त्यांचा दर्जा वेगळा आहे. ते लोकमताचा आदर करणारे नेते आहेत. त्यामुळे मोदी आणि शहा हे कोणत्याही कारणानं राज्यात राष्ट्रपती राजवट आणून सरकार पाडणार नाहीत. सरकार पडण्याबाबत राज्यातील काही मंत्री काहीही बोलत आहेत. ते का असं बोलत आहेत ते मला माहीत नाही. त्याबद्दल त्यांनाच विचारा, असा टोलाही त्यांनी हाणला.

अजित पवारांनी माझ्यावर टीका केली. काही नेते राज्यातील प्रश्नांवर बोलताना दिसले नाहीत. पण माझ्यावर टीका करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला. हरकत नाही. पवारांना बरं वाटावं म्हणून त्यांना हा विषय चालवायचा असेल तर खुशाल चालू द्या, असा चिमटा त्यांनी काढला.आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं? पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलेली कशी चालते? मी सामान्य माणूस आहे तर मग माझ्यावर टीका कशाला करता? असा सवालही त्यांनी केला. राजकारणात अशा टीका होतंच असतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मी अनेकदा टीका करतो. पण त्यावर ते कधी बोलत नाहीत. मी रात गई बात गई, अशा पद्धतीने वागणारा माणूस आहे, असंही ते म्हणाले. मी कोणत्याही ट्रोलिंगला घाबरत नाही, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचा ‘कन्फ्यूज सरकार’ असा उल्लेख करत खिल्ली उडवली. हे सरकार कन्फ्यूज  आहे. सरकारमध्ये एकमेकांचा पायपोस नाही. गोंधळलेलं सरकार आहे. शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून हे सरकार मुलांच्या मानसिकतेशी खेळत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER