मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने दिल्ली आणि देश वेठीस धरण्याचा प्रयत्न – चंद्रकांत पाटील

कणकवली :“सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे व ते म्हणत आहेत की हे कायदे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहेत! सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात इतर ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही, उलट समर्थन आहे.” असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करणाऱ्यांवर टीका केली.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा नेते खासदार नारायण राणे, आमदार रवींद्र  चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात ‘ट्रॅक्टर रॅली’ काढण्यात आली होती. पाटील या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.या कायद्याच्या समर्थनात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे, असे सुचवताना ते म्हणालेत, “देशभरात इतर ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही, उलट समर्थन मिळते आहे. सहा महिन्यांनंतर  जाग आल्यानंतर एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

देशभरातील शेतकरी रस्त्यावर आले नाही आणि हे काय नाटक सुरू आहे? आमचा कृषी कायद्याला पाठिंबा आहे असे म्हटले नाही तर त्यांचे (विरोधकांचे) म्हणणे खरे ठरेल.” “महाराष्ट्रात या कायद्याला विरोध नाही. मग आपण रस्त्यावर का यायचे? तर, ते(विरोधक) रस्त्यावर येऊन थेट कॅनडापासून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की आमच्यावर अन्याय होतो आहे. म्हणून आपल्याला हे कायदे आमच्या फायद्याचे आहेत.

या कायद्यामुळे आमचे आयुष्य समृद्ध होणार आहे हे जगाला सांगावे लागणार आहे. मूठभर शेतकरी दिल्लीत बसले आहेत. तिथे काय-काय सुरू आहे हे आपल्याला माध्यमांद्वारे दिसत आहे. त्याला उत्तर म्हणून हे दाखवण्याची आवश्यकता आहे की, संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी आहे. संपूर्ण देश या कायद्यांच्या बाजूने आहे. संपूर्ण देश या कायद्याचे समर्थन करतो आहे. हे दाखवण्याचा एक भाग ही आजची ट्रॅक्टर रॅली आहे, शेतकऱ्यांची रॅली आहे. ज्यामध्ये आपण काही मागण्या करत नाहीत. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी भाजपा मैदानात असा संदेश देत आहोत.” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER