चंद्रकांत पाटलांना 32 तारखेच्या पहाटेची वाट मात्र, हे स्वप्न पुर्ण होणार नाही – शिवसेना

Chandrakant Patil - Abdul Sattar

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीनंतर राज्यात सत्ताबदलाची आणि युतीची चर्चा सुरू झाली मात्र, फडणवीस आणि राऊत या दोन्ही नेत्यांनी ही भेट राजकीय नसल्याचा खुलासा केल्यानंतर या चर्चेवर तात्पुरता पडदा पडला होता. मात्र, भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा या चर्चेला वाव मिळेल असे विधान केले आहे. दोन मोठे नेते भेटतात तेव्हा राजकारणावर नाही तर काय निव्वळ चहा बिस्किटांसाठी भेटतात का असं खोचक विधान पाटील यांनी केले तसेच, मध्यावधी निवडणुकांबाबतही पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील सरकार अस्तिरतेबाबतच्या चर्चेला पुन्हा वाव मिळाला आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या या विधानांवर शिवसेना नेते कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘भाजपला रात्रीत बदल घडवण्याची सवय लागली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले आहेत. 32 तारीख कधी येईल? कधी त्यांची पहाट उजाडेल, कधी त्यांना त्या पहाटेचा सुर्य दिसेल?’, असे खोचक प्रश्न करत शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी टोला लगावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारबाबत बोलताना एखाद्या पाहाटे काहीही घडू शकतं, असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाबाबत अब्दुल सत्तार यांना विचारलं असता त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे.

‘भाजपचा रात्रीचा खेळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे. पण मुंगेरीलाल के सपने कभी पुरे नही होते. ते स्वप्न फक्त स्वप्नच राहतात. माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे की, कमीत कमी लोकांची दिशाभूल करु नका’, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं.

तसेच, सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) समर्थनार्थ विधान करत म्हणाले, ‘देशामध्ये मोजके जे मुख्यमंत्री आहेत त्यामध्ये संयमी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आहे. त्यांचं नाव देशभर घेतलं जात आहे. मग त्यांचं राज्यात नाव घ्यायला काय हरकत आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संयमी आहेत, असे केंद्रातील अनेक मंत्री म्हणतात’, असं सत्तार म्हणाले.

‘महाराष्ट्र सरकारचा केंद्रबिंदू उद्धव ठाकरे आहेत. या संकट काळात नियोजनबद्ध राज्य चालवण्याचं काम उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. महाविकास आघाडीचे नेते ज्यापद्धतीने काम करत आहेत ते पाहून पुढचे पाच वर्ष चंद्रकांत पाटील यांचे अशाप्रकारचे स्वप्न ऐकायला मिळेल’, अशा शब्दांत सत्तार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानवार टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER