जळगावातील भाजप नेत्यांच्या बैठकीला एकनाथ खडसेंची दांडी

Jalgaon Meeting

जळगाव : राज्यात भाजपचे सरकार येता येता राहिले. ऐनवेळी शिवसेनेने विरोधकांसोबत घरोबा केल्याने भाजपची यावेळची सरकार स्थापण्याची संधी हुकली. त्यानंतर पक्षातील नाराजांनी एकी केल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर भाजपने जळगाव येथे पक्षाची कोअर कमिटीची मीटिंग घेतली. परंतु विभागीय कोअर कमिटीच्या या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीच दांडी मारली. या बैठकीच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे खडसेंची समजूत घालण्यासाठी जळगावात गेले होते.

मात्र खडसेंनी या बैठकीला येणे टाळले. राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिलेला असतानासुद्धा ऐनवेळी शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून भाजपसोबतची तीस वर्षांची युती तोडली आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर आठवडाभराच्या आतच भाजपमधील नाराजांच्या गटाची चर्चा रंगायला लागली. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षावरची नाराजी अप्रत्यक्षपणे जाहीर केली होती.

सोशल मीडियाच्या माध्यामातून पक्षाचे चिन्ह हटवून सर्वप्रथम पंकजा मुंडेंनी पक्षात खळबळ उडवून दिली. त्यानंतर एकनाथ खडसेंनी हीच ती वेळ म्हणून आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याला उत्तर देताना, भाजपमधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असे खुले आव्हान गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना केले होते.

त्यामुळे खडसे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या विभागवार बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. गिरीश महाजन यांनी दिलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर महाजन आणि खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षणात बैठका होत आहेत. पक्षांतर्गत वाद झाल्यास ते बाहेर फुटू नयेत, म्हणून बंद दाराआड चर्चा करण्यात आली. परंतु एकनाथ खडसे यांनी बैठकीला हजेरी लावणेच टाळले.

शरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?