
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच नैतिकतेच्या आधारावर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा कडक इशाराही दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्या कबुली जबाबावर कुणीही आरोप केलेले नाही. धनंजय मुंडे यांचे १५ वर्षे या महिलेशी संबंध होते. त्या महिलेपासून त्यांना दोन मुले आहेत. त्या मुलांना मुंडेंचं नाव दिलं गेलं आहे. महिलेच्या बहिणीने मुंडेंवर बळजबरी केल्याची तक्रार केली आहे. याबाबत पोलिसांनी शहानिशा करावी. त्यात आम्हाला पडायचं नाही. पण जे धनंजय मुंडेंनी मान्य केलं आहे, नैतिकता आणि कायदा या दोन्हींच्या चौकटीत न बसणारी गोष्ट केल्यानंतर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या पदावर त्यांनी राहायचं की नाही? ते अतिशय संवेदनशील आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर त्या त्या वेळेला मंत्र्यांनी स्वत:हून राजीनामे दिलेले आहेत. मुंबई विद्यापीठातील मार्क वाढवण्याबाबतचं प्रकरण तुम्हाला आठवत असेल.
धनंजय मुंडे यांनी स्वत: निर्णय घ्यायला हवा की, इतक्या मोठ्या पदावर राहिल्यानंतर, इतकी मोठी घटना आपल्यासोबत घडल्यानंतर आपण इतक्या महत्त्वाच्या पदावर राहायला नको. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. पवारसाहेबांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. हे राजीनामे नजिकच्या काळात झाले नाहीत तर भाजप महाराष्ट्रभर आंदोलन करेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, एक दंडशक्ती, एक अंकुशशक्ती म्हणून काम करायचं हीच भूमिका विरोधी पक्षाला दिलेली आहे.
या शक्तीनं जे चुकीचं चाललं आहे त्याचा जाब विचारायचा असतो. लोकांनी ती जबाबदारी दिलेली असते. धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा आवाहन करेल, माणूस म्हणून चूक घडू शकते. पण नैतिकतेने ते कायद्यात बसणार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. खूप राजकीय जीवन त्यांना जगायला मिळाले. या राजकीय जीवनात मंत्री न राहता नॉर्मल कार्यकर्ता म्हणून काम करायला वाव आहे. त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री आणि पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. नाही तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला