महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले, चंद्रकांत पाटील यांची टीका

Chandrakant Patil

अमरावती : राज्यात पुराचं मोठं संकट आलं. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कोरोना महामारीत केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक पॅकेजेस जाहीर केले. पण राज्य सरकारने कुठलंही पॅकेज दिलं नाही. तसेच रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. पण पत्रकारांकडून त्यांच्या अटकेचा कुठेही निषेध होत नाही आहे. असे असताना भारतीय जनता पक्षाला अर्णवचा येवढा कळवळा का, असा प्रश्‍न पत्रकारांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना केला. त्यावर आम्ही आमचे मत मांडले, प्रसार माध्यमांना योग्य वाटत असेल तर छापा, अशा शब्दात त्यांनी पोलिस कारवाईचा व राज्य सरकारचा निषेध केला. सोबतच राज्यातील महाविकास आघाडी सर्व आघाड्यांवर अपयशी झाल्याचाही आरोप केला.

यावेळी पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार कोरनापासून ते सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीने बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारने केवळ घोषणा केली असून ही मदत तोकडी असल्याचे व शिक्षण विभागासह मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला. कोरोनाकाळात जे विद्यार्थी पदवी घेतील, त्यांच्या उल्लेख कोरनाकाळातील पदवी असा होईल. राज्यात पुराचं मोठं संकट आलं. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही,. असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. राज्यात सामाजिक अस्थिरता आणि दंडुकेशाही सुरु आहे. तसेच, पत्रकार आज सुपात आहेत; उद्या जात्यात असतील. शिवसेनच्या मुखपत्रात झालेल्या टीकेवर बोलताना आम्ही या टीकेला गंभीरपणे घेत नाही असे म्हणत ते मुखपत्र कोण वाचतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील पक्षबांधणीच्या कामासाठी अमरावती जिह्यात आले होते. यावेळी त्यांनी अमरावती विभागाच्या भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोरोना काळातसुद्धा आमच्या संघटनेचं काम व्हर्च्यूअल माध्यमातून सुरुच होतं. आता आम्ही बाहेर पडलो आहोत. आमच्या पक्षाच्या बैठका सुरु झाल्या आहेत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरु झाले आहे. आम्ही त्यांची मतं जाणून घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER