मुख्यमंत्र्यांची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे ; भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandrakant Patil CM uddhav-Thackeray.jpg

मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट (Corona virus) आहे .या कठीण काळात मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) घरात बसून काम करतात या विरोधकांच्या आरोपावर रविवारी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे उत्तर दिले.जिथे तुम्ही जाऊ शकत नाही, तिथे मी पोहचलो, दुर्गम भागात मी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला होता. त्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुळात हे वक्तव्य पुन्हा एकदा मातोश्रीत लपून राहण्यासाठी केलं आहे. उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे किती रुग्णालय आणि कोविड सेंटरचे निरीक्षण केले? राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते जबाबदारी समजून राज्यभरातील रुग्णालयांमध्ये प्रवास करत आहेत. रुग्णांचे हाल जाणून घेत आहेत. प्रशासनाच्या, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनी विश्वास निर्माण करत आहेत. मग तुम्ही मातोश्रीमध्ये बसल्या बसल्या किती कोविड सेंटरची परिस्थिती जाणून घेतली याचे उत्तर राज्यातील जनतेला द्यावे. तुमची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

;

तसेच केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्याच्या आढावा घेण्यात तुम्ही कसले समाधान मानत आहात? तुमच्या मातोश्रीबाहेर न निघण्यामुळे कित्येक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे धैर्य खचले आहे. ठाऊक आहे का तुम्हाला? हे कधी समजणार हेच कळत नाही. त्यामुळे केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्यापेक्षा प्रत्यक्ष फिरलात तर तुम्हाला राज्याच्या जनतेचे खरे प्रश्न कळतील अशी टीकाही भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला . मग कंगना राणौत विषय महाराष्ट्रात कोणी सुरु केला? तुम्हीच केला ना. सुशांत सिंग प्रकरणात एफआयआर दाखल करुन मुंबई पोलिसांनी जर योग्य चौकशी केली असती तर केंद्रीय तपास यंत्रणेला काहीच करावे लागले नसते. त्यामुळे आता तुम्हाला आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे. मास्क लावल्यामुळेच कदाचित विरोधी पक्ष राजकारण करत असेल असे वाटत असेल पण त्यांनी मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल असेही चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER