गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करू- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

पुणे :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने नेहमीच वनवासी बांधवांच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली आहे. या सरकारच्या धोरणामुळे राज्यातील वनवासी बांधवांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पण राज्य सरकारने त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी कायमच दुर्लक्ष केले. कारण हे ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यामुळे अशा सरकारला जागं करण्यासाठी जनतेचे प्रश्न शोधून त्यावर आंदोलन उभारून सरकारचे लक्ष वेधले पाहिजे, असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. चंद्रकांत पाटील शुक्रवारी भोसरी (पुणे) येथे आयोजित जनजाती मोर्च्याच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

राज्यातील आघाडी सरकारमुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्या समस्या शोधून आंदोलने उभी केली पाहिजेत. सध्या राज्याच्या वसतिगृहातील अवस्था अत्यंत दयनीय आहे. डी.बी.टी.च्या माध्यमातून वनवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे जमा केले जातात, त्यातही भोंगळ कारभार सुरू आहे. काहींनी खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून शासकीय नोकऱ्यांचा लाभ घेतला. पण सरकारला याच्याशी काहीही घेणे-देणे नाही, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना वनवासी समाजाच्या विकासासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने २५ हजार वनवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शहरात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांची सर्व फी आमच्या सरकारने भरली. त्यासोबतच वनपट्टे वनवासी बांधवांना मिळवून दिले. त्यासाठीचा जो कायदा होता, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. या सर्व कामांची माहिती कार्यकर्त्यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवली पाहिजे, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER