प्रचार फेरीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी टाळली वाहतूक कोंडी!

-गाडी मागे ठेवून छोट्या वस्त्यांमधून रिक्षातून प्रवास

पुणे (प्रतिनिधी) : प्रचार फेरी दरम्यान छोट्या वस्त्या आणि गल्लीबोळ यांमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चक्क रिक्षातून प्रवास केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पदयात्रेस सुरुवात झाली. या पदयात्रेनंतर बालेवाडी येथील नियोजित रावसाहेब दानवे पाटील यांच्या सभेला जाणे गरजेचे होते. गल्ली-बोळातील रस्ते अरुंद असल्याने चंद्रकांत दादांचे वाहन येथे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे शास्त्रीनगर येथून रिक्षाने जात प्रचार केला. तसेच रिक्षाने मुख्य महामार्गापर्यंत प्रवास केला. यानंतर मुख्य मार्गावर आपली नेहमीची गाडी आल्यानंतर बालेवाडीकडे प्रस्थान केले.

मात्र, निवडणुकीच्या धामधुमीतही दादांनी आपल्यातील साधेपणा जपत सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे प्रवास केला आणि वाहतूक कोंडी टाळली, याचे कोथरूडकर नागरिकांकडून कौतुक होत आहे.