शरद पवार शेतकऱ्यांचं दु:ख जाणणारे चांगले नेते; चंद्रकांत पाटलांकडून कौतुक

chandrakant-patil-appreciate-sharad-pawar

सोलापूर : राज्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या संघर्षात आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादामुळे आतापर्यंत भाजप-शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार याचं कोडं आद्यपही सुटलेलं नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.

राज्यात आलेल्या महापुरानं आणि त्यानंतर अवकाळी पावसानं शेतकर्‍यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर शरद पवार शेतकऱ्यांचं दु:ख जाणणारे चांगले नेते आहेत, असे म्हणत त्यांनी पवारांचे कौतुक केले आहे. निकालाच्या आधी शरद पवारांना लक्ष्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आपला सूर बदलला आहे. त्यांनी पवारांचं कौतुक केल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. हा राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत पाटील कार्तिक एकादशीच्या महापूजेसाठी ७ नोव्हेंबरला संध्याकाळी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत देऊनही सरकार स्थापन होत नाही, हे दु:ख आहे. असं असतानाही सरकार स्थापन होत नाही याचं दुःख आहे.

मात्र, भाजप नेत्यांवर वारंवार टीका केली जाते, याचे दु:ख अधिक आहे. कधी नव्हे राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. परंतु सहकारी पक्ष शिवसेनेने जनतेच्या मताचा अनादर केला आहे. ही बाबदेखील तितकीच वाईट आहे.” असे म्हणत पाटील यांनी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवरील आपली नाराजी व्यक्त केली आहे. आमचे आमदार फोडण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे, असा आरोप शिवसेनेकडून केला गेला होता. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही.

जे नेते आमच्यासोबत आले आहेत ते फक्त विकासाची दूरदृष्टी ठेवून आले. भाजप कोणत्याही पक्षाचा आमदार फोडणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने जनादेश देऊनही अद्याप राज्यात सरकार स्थापन होत नाही याचं दुःख असल्याची भावनाही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात राष्ट्रपती शासन येणार असल्याचं बोललं जात आहे. निसर्गाचं बदललेलं चक्र पूर्ववत व्हावं आणि संकटामागून येणाऱ्या संकटातून बळीराजा आणि राज्यातील जनतेला सावरण्याची शक्ती दे, असं साकडं महापूजेनंतर विठ्ठलाला घालणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.