‘मनी लॉन्ड्रिंग’ खटल्यात चंदा कोचर यांना जामीन

Chanda Kochhar
  • व्हिडिओकॉनच्या बुडित कर्जांचे प्रकरण

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate-ED) ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल केलेल्या खटल्यात येथील विशेष न्यायालयाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) चंदा कोचर (Chanda Kochhar) यांना शुक्रवारी  पाच लाख रुपयांचा जामीन मंजूर केला.

‘मनी लॉन्ड्रिंग‘प्रतिबंधक कायद्याखालील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत नांदगावकर यांनी जारी केलेल्या समन्सनुसार चंदा कोचर न्यायालयात हजर झाल्या. त्यांच्यावतीने जामिनासाठी युक्तिवाद करताना अ‍ॅड. विजय अगरवाल यांनी सांगितले की, कोचर तपासात ‘ईडी’ला पूर्ण सहकार्य करत आहेत. शिवाय ‘मनी लॉन्ड्रिंग’ कायद्यानुसार अजामीनपात्र गुन्ह्यातही महिलांना जामीन दिला जाऊ शकतो, असे त्यांनी निदर्शनास आणले.  हे लक्षात घेऊन न्यायालयाने कोचर यांना जामीन मंजूर केला व जामिनाची रक्कम रोखीने भारण्याचीही मुभा दिली. न्यायालयाच्या पूर्वानुमतीशिवाय देशाबाहेर न जाण्याची अट त्यासाठी घालण्यात आली.

या खटल्यातील आरोपी म्हणून चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर व व्हिडिओकॉन उद्योगसमुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ  धूत यांच्यासह फियार्दीत उल्लेख असलेल्या सर्व ११ आरोपींविरुद्ध समन्स जारी करून त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर होण्यास सांगण्यात आले होते. दीपक कोचर सध्या ‘ईडी’च्याच ताब्यात असल्याने त्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून हजर केले गेले. धूत व इतर आरोपींवर समन्स न बजावले जाऊ शकल्याने ते हजर झाले नाहीत, असे सांगण्यात आले.खटल्याचे पुढील कामकाज १२ मार्चपर्यंत तहकूब केले गेले.

जून २००९ ते ऑक्टोबर २०११ या काळात आयसीआयसीआय बँकेकडून धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगस्मूुहास दिलेल्या १,७५० कोटी रुपयांच्या पाच कर्जांंच्या संदर्भात हा खटला आहे. याआधी केंद्रीय गुप्तचर विभागाने (CBI) याच व्यवहारांवरून कोचर, धूत व इतरांवर फौजदारी खटला दाखल केला आहे. तेच सूत्र पकडून ‘ईडी’ने हा ‘मनी लॉन्ड्रिंग’चा  स्वतंत्र खटला सुरु केला आहे. ‘सीबीआय’च्या खटल्यात अटक झालेले दीपक कोचर अद्यापही तुरुंगात आहेत.

सन १९८४ मध्ये आयसीआयसीआय बँकेत नोकरीस लागलेल्या चंदा कोचर सन २००९ मध्ये त्या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. आपल्या पतीचे धूत व व्हिडिओकॉनशी घनिष्ट व्यावसायिक संबंध आहेत हे चंदा कोचर यांनी कर्ज मंजुरी समितीच्या निदर्शनास आणले नाही किंवा त्यांनी त्या मंजुरी प्रक्रियेपासून स्वत:ला दूरही ठेवले नाही, असा या फियार्दीत आरोप आहे. कोचर दाम्पत्य राहात असलेला चर्चगेट येथील ह्यसीसीआय चेंबर्सह्णमधील पाच कोटी रुपयांहून अधिक बाजारभाव असलेला प्लॅट याच ‘काळ्या’ पैशातून अवघ्या ११ लाख रुपयांत घेण्यात आला, असाही ‘ईडी’चा दावा आहे.

‘ईडी’ने केलेला तपास, सादर केलेली कागदपत्रे व तपासात नोंदविलेले जाबजबाब यावरून वेणुगोपाल धूत व व त्यांच्या व्हिडिओकॉन समूहातील कंपन्यांना आयसीआयसीआय बँकेकडून कर्जे देताना चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे, ही कर्जे कोचर यांच्या पतींच्या कंपन्यांना लाभ करून देण्याच्या स्वरूपात लाच घेऊन दिली गेली आणि या गुन्हेगारी कृत्यांतून मिळविलेला पैसा आरोपींनी अनेक कंपन्यांमधून फिरवून काळ्याचा  पांढरा केल्याचे प्रथमदशनी दिसते, असे न्यायाधीश नांदगावकर यांनी समन्स जारी करतानाच्या आदेशात म्हटले होते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER