मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Heavy rain.jpg

पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण राज्यात सध्या ढगाळ हवामान आहे. दक्षिणेकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस चंद्रपूर येथे होते.

ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे समुद्रावरुन बाष्पयुक्त हवा येते आहे. हे वारे घडाळ्याच्या काट्यांच्या उलट दिशेने फिरत दक्षिणेकडून उत्तरेकडे सध्या तीन ते साडेचार कि. मी. उंचावरुन वाहत आहेत. वारे जसे उंच जातात तसे त्यांचे तापमान कमी होते. ५ कि. मी. उंचीवर त्यांचे तापमान शून्य अंश सेल्सिअस होऊन वाऱ्यातील वाफेचे गारांमध्ये रुपांतर होते. या गारांची संख्या वाढली व खालून येणाऱ्या हवेपेक्षा त्यांचे आकारमान व वजन जास्त झाले की ते खाली येतात व गारपीट होते. मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

१३ डिसेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशीक, पुणे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. १३, १४ व १५ डिसेंबर रोजी अकोला, भंडारा, बुलढाणा, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. १४ व १५ डिसेंबर रोजी गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. वाशीम, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात १५ व १६ डिसेंबर रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER