राजकारणातील चाणक्य : शरद पवारांच्या गुगलीने काढली आघाडीतील नेत्यांची हवा

Sharad Pawar - NCP

विजय गावंडे

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपदाबाबत विधान करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे सर्वानाच वाटत असते. आमच्या पक्षातील मुख्यमंत्री बसवायचा असेल तर पक्ष अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी पक्षातील आमदारांचे संख्याबळ पुरेसे करण्याची गरज आहे. पुढे असा काही चमत्कार झाला तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आमच्या पक्षातील नेत्यांना मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील नेत्यांना बुचकळ्यात टाकले. त्यांच्या या विधानावर शरद पवार (Sharad Pawar) काय प्रतिक्रिया देतील याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलेले होते. आणि शेवटी काल त्यांनी अशी काही गुगली फेकली की जयंतरावांसह महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले नेते घायाळ होऊन बसले.

काल कोल्हापुरात (Kolhapur) झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अपेक्षेप्रमाणे पत्रकारांनी पवारांना जयंत पाटील यांच्या इच्छेबाबत विचारणा केली. आणि त्यावर राजकारणातले चाणक्य म्हणून ओळख असलेल्या पवारांनी क्षणाचाही विलंब न करता एका झटक्यात सर्वाना घायाळ केले. आपण मुख्यंमत्री व्हावे अशी इच्छा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. पण ते झाले का? उद्या जर मला वाटेल मुख्यमंत्री व्हावं; कुणी करणार का? जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, मग त्यांना शुभेच्छा’, असं म्हणत शरद पवार यांनी मोठी गुगली फेकत जयंतरावांची हवाच काढली. सोबतच इतर पक्षात मुख्यमंत्रीपदाची इच्छा बाळगून असलेल्या नेत्यांना एका वाक्यात घायाळ केले.

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवल्यानंतर राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेत्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना शरद पवारांना नक्कीच आली होती. राष्ट्रवादीत पहिल्या फळीत बसणाऱ्या नेत्यांमध्ये जयंतराव असले तरी, पवारांची लेक सुप्रिया, पुतण्या अजित पवार (Ajit Pawar), नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह काही नेते आहेत. जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्री बसवण्याची संधी मिळाली तर पवार सर्वात आधी दोन नावांना सहमती देतील ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजितदादा हे सर्वज्ञात आहे. तरीही जयंतरावांनी केलेले विधान हे पवारांना पचनी न पडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच त्यांनी अशी काही गुगली फेकली की जयंतरावांची हवाच निघाली. पवारांनी केलेल्या विधानाचा अर्थ काढायचा झाल्यास असे म्हणता येईल की, जयंतराव तुमची इच्छा रास्त आहे. मात्र मी वयाच्या ८०व्या वर्षीही राजकारणात सक्रिय आहे. जर मुख्यमंत्री बनवण्याची संधी मिळालीच तर मी मागे कसा हटणार.

तर दुसरीकडे जयंत पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीची चर्चा सुरु झाली. मात्र पवारांच्या विधानाचा रोख महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडे होता हे दिसून आले. कारण याची प्रचिती कालच दिसून आली काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भर सभेत जयंतरावांना टोला लगावत सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातच काम करण्याची इच्छा प्रकट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय काढायचा, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असले तरी शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीमुळे चव्हाणांनी हे विधान केल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने एकप्रकारे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे जयंतरावांनी व्यक्त केलेल्या इच्छेमुळे मुख्यमंत्रीपदाची मनोमन अपेक्षा बाळगणाऱ्या अजित दादांनाही मोठा झटका बसला असेल तर त्यात नवल वाटायला नको. कारण जयंतरावांच्या इच्छेबाबत त्यांनीही बोलक्या उत्तर दिलेच आहे. पाटलांच्या विधानावर अजित पवार यांना पत्रकारांनी छेडलं असता अजित पवार यांनी शेलक्या शब्दात उत्तर दिलं. जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो, असं बोलकं उत्तर देत अजितदादांनी एकप्रकारे जयंत पाटलांना त्यांची असलेली इच्छा पूर्ण होणार नाही हे सांगून दिले.

ही बातमी पण वाचा : मोदींनंतर पंतप्रधानपदी कोणाला पसंती? शरद पवार की गडकरी? सर्वेक्षणातून ‘या’ नावाला पसंती 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER