कोकण परिमंडलापुढे मार्चपर्यंत ४१ कोटी ७९ लाखाच्या वसुलीचे आव्हान

रत्नागिरी(प्रतिनिधी):  महावितरणच्या कोकण परिमंडलातील एक लाख ४३ हजार ६०७ ग्राहकांकडे ४१ कोटी ७९ लाख रूपयाची थकबाकी शिल्लक आहे. वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुलीमध्ये तफावत असल्याने शंभर टक्के वसुलीसाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम राबवून मार्चपर्यंत कोकण वीजबिल थकबाकी मुक्त करण्याचे प्रशासनाने आदेश दिल्याने कोट्यवधीच्या वसुलीचे उद्दिष्ट निर्माण झाले आहे.

महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी ‘शून्य थकबाकी’ मोहीम राबविण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोकण परिमंडलातर्फे महावितरणने थकबाकी वसुली सुरू केली आहे. कोकण परिमंडलातील एक लाख १८ हजार ९५९ घरगुती ग्राहकांकडे २२ कोटी ७ लाख ९७ हजार रूपयांची थकबाकी आहे. वाणिज्यिकच्या १५ हजार ५८६ ग्राहकांकडे आठ कोटी आठ लाख ६८ हजार, औद्योगिकच्या १७३० ग्राहकांकडे एक कोटी ४५ लाख ८४ हजार रूपयांची थकबाकी आहे. एकूण एक लाख ४३ हजार ६०७ ग्राहकांकडे ४१ कोटी ७९ लाखाची थकबाकी शिल्लक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ हजार ७२२ घरगुती ग्राहकांकडे ११ कोटी ८६ लाख ४८ हजार, वाणिज्यिकच्या ९ हजार ४६२ ग्राहकांकडे चार कोटी २६ लाख ३१ हजार, औद्योगिकच्या ९१९ ग्राहकांकडे ८४ लाख ३९ हजार मिळून विविध मिळून एकूण ७६ हजार ३७७ ग्राहकांकडे १९ कोटी २० लाख २१ हजार रूपयांची थकबाकी शिल्लक आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ५३ हजार २३७ घरगुती ग्राहकांकडे एक कोटी २१ लाख ४८ हजार, वाणिज्यिकच्या ६ हजार १२४ ग्राहकांकडे ३ कोटी ८२ लाख ३७ हजार, औद्योगिकच्या ८११ ग्राहकाकडे ६१ लाख ४६ हजार व अन्य विविध ग्राहकांची मिळून एकूण ६७ हजार २३० ग्राहकांकडे २२ कोटी ५८ लाख ७९ हजार रूपयांची थकबाकी शिल्लक आहे.