रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला २८ हजार कोटी मिळणार !

RBI

मुंबई : रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त रक्कमेवर केंद्र सरकार डोळा ठेऊन आहे. त्यावरून आजवर अनेक प्रकारचे वाद झाले. त्यांनतर आता बँक सरकारला २८ हजार कोटी रुपये लाभांशाच्या रुपात देण्याची शक्यता आहे.रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या राखीव (सरप्लस) रकमेमधून सरकारला हिस्सा देण्यात येणार नाही.

रिझर्व्ह बँकेच्या ऑडिट कमिटीने चालू आर्थिक वर्षाच्या मर्यादित आकलनाच्या आधारावर केंद्र सरकारला २८ हजार कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा १८ फेब्रुवारीला होणाऱ्या बोर्ड मिटिंगमध्ये करण्यात येईल.

रिझर्व्ह बँकेकडे जमा होत असलेल्या अतिरिक्त रकमेपैकी एका भागाची मागणी केंद्र सरकारकडून सातत्याने होत आहे. केंद्र सरकारकडून या रकमेचा उल्लेख एक्सेस रिटर्न्स म्हणून करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेकडे असलेला राखीव निधी हा गरजेपेक्षा अधिक असल्याचा दावा केंद्राकडून करण्यात येत आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेकडे किती राखीव रक्कम असावी याचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली आहे.

२८ हजार कोटी रुपये ही रक्कम गेल्यावर्षी देण्यात आलेल्या ४० हजार कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.